Molestation of girl; G.P. Three years of imprisonment for the member | मुलीचा विनयभंग; आळंदा ग्रा.पं. सदस्याला तीन वर्षांचा कारावास

ठळक मुद्देवर्गशिक्षिका झाली फितूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल जनार्दन मोहोड (४५) याला द्वितीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. 
१६ जुलै २0१५ रोजी शाळेतून दुपारी जेवणासाठी चौथीत शिकणारी विद्यार्थिनी घरी जेवणासाठी आली होती. आळंदा येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल मोहोड याने तिला त्याच्या घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. पीडित विद्यार्थिनीचे आई-वडील घरी आल्यावर तिने झालेला प्रकार त्यांना सांगितला. विद्यार्थिनीचे आई-वडील राहुल मोहोड याला विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, त्याने तिच्या आई-वडिलांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. 
विद्यार्थिनीने २२ जुलै रोजी बाश्रीटाकळी पोलिसांकडे तक्रार केली. 
पोलिसांनी राहुल मोहोड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0६ आणि पॉस्कोनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. साक्ष व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ आनंद गोदे यांनी बाजू मांडली.