मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:16 PM2019-04-12T18:16:15+5:302019-04-12T18:22:41+5:30

ज्यांच्या पदस्पर्शाने ही संपूर्ण भरतभूमी पुनित झालेली आहे. त्या श्रीरामप्रभूंचे अवतारकार्य महान असून सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

Maryada Purushottam Shriram | मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

googlenewsNext

ज्यांच्या पदस्पर्शाने ही संपूर्ण भरतभूमी पुनित झालेली आहे. त्या श्रीरामप्रभूंचे अवतारकार्य महान असून सर्वांसाठी अनुकरणीय आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाने संपूर्ण विश्वाला नितीमत्तेचा एक महान आदर्श निर्माण करून देणारे श्रीरामप्रभू अवघ्या भारतवासियांना पुजनीय आहेत. ज्यांच्या नामाचा महिमा वेद, उपनिषद व ऋषीमुनींनी गाईला आहे. राम ह्या नामातच एवढे सामर्थ्य आहे की, कुटूंबाच्या चरितार्थासाठी वाटमारीचे कार्ये करणा-या वाल्या कोळ्याने उलटे म्हटले तरी त्यांचा मानसिक कायापालट होऊन ते श्री वाल्मिकी रामायणाचे कर्ते ठरले.
संत तुकारामांनी तर काम, क्रोध अभिमान जाण्यासाठी रामनामाची मात्रा दिली आहे-

राम म्हणता कामक्रोधाचे दहन। होय अभिमान देशधडी।।१।।
राम म्हणता कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ।।ध्रु।।
राम म्हणे जन्म नाही गर्भवास । नाही दारिद्रास पात्र कधी।।२।।
राम म्हणता यम शरणागत बापुडे । आढळ पद पुढे काय तेथे।।३।।
राम म्हणता धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ।।४।।
राम म्हणतां म्हणे तुक्याचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाही।।५।।

एकवचनी, एकपत्नी हे व्रत ज्यांनी धारण करून रघुकुलाच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत ते श्रीराम केवळ वडिलांच्या वचनपुर्तीसाठी बारा वर्षे वनवासात गेले व आपली राजगादी आपला धाकटा बंधू भरताला दिली. त्यागाचे हे प्रतिक केवळ एकट्या भरतखंडातच पाहावयास मिळते. रामाने आपल्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी सुखी संसाराचा त्याग करतात. यापेक्षा मोठा संदेश आई वडिलांची आज्ञा पालन करावे हा संदेश आजच्या
युवा पिढीला आहे. प्रत्येक कुटुंबातील तरुण युवकांसाठी श्रीरामाची ही कृती आचरणशील आहे. आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पालन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. श्रीरामाच्या जीवनातून त्यागाचा महत्वाचा संदेश आपल्याला प्राप्त होतो. त्याच्या नावातच प्रत्येकाला आराम देण्याचे सामर्थ्य आहे.
राम म्हणता रामची होइजे ।
शबरीच्या प्रेमापोटी तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम ह्या कृतीतून हाच संदेश देतात की निर्मळ, निर्व्याज प्रेमाचा सर्वांनी आदर केला पाहीजे. शबरीच्या झोपडीत जावून तिच्या बोरांची चव आपल्या चरित्रात अजरामर करणारे श्रीराम सर्वाच्याच ह्रदयात वास करतात. आपल्या प्रत्येक कृतीने मनुष्य जीवाचे कल्याण करणारा संदेश ते देतात. वनवासात असतांना आपल्या वाट्याचा वनवास मी एकट्याने पूर्ण केला पाहिजे असे ते म्हणतात. परंतू त्याच्यावरील प्रेमासाठीच सीतामाई व बंधू लक्ष्मण यांनी त्यांची कधीही सोबत सोडली नाही. काहीतरी करता काम । मुखी म्हणा राम राम म्हणजेच तुम्ही कोणत्याही कामात असा रामाच्या कृतील विसरू नका. संकट आले असता आपण संघटन केले पाहिजे असा संदेश ते देतात म्हणूनच त्यांनी वनवासात असतांना संपूर्ण वानरसेनेला संघटीत करून हनुमंतरायाला त्याचे प्रमुख केले व रावणासारख्या बलाढ्य शत्रुचा त्यांनी रामबाण इलाज केला. शत्रूंच्या ह्या गर्दीतही त्यांनी बिभीषणासारख्या मित्राला ओळखून त्याला रावणवधानंतर लंकेचे राज्य दिले. श्रीरामांचे हे
सर्व सद्गुण प्रत्येक मनुष्याला दिशादर्शक आहेत म्हणून श्रीरामांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवावा असाच आहे. शीवशंकरांनी तर त्यांचे नाम आपल्या मुखातच धारण केले असल्याचे दिसते.

रामराम उत्तम अक्षरे। कंठी धरिली आपण शंकरे।।१।।
कैसी तारक उत्तम तिही लोकां ।। हळाहळाशीतळ केले शिवा देखा ।।ध्रु।।
हाचि मंत्र उपदेश भवानी ।. तिच्या चुकल्या गर्भादियोनी।।२।।
जुन्हाट नागर नीच नवे । तुका म्हणे म्यां धरिले जीवे भावे।।३।।

श्रीरामांच्या आदर्शाची आजही ह्या देशाला गरज आहे. वडिलांच्या आज्ञेचे पालन करणा-या त्या श्रीरामाची विज्ञानाच्या ह्या युगातही घराघरात आवश्यकता आहे. तो सुसंस्कारीत श्रीराम आज घराघरात मातांपित्यांनी जन्माला घालण्याची वेळ आज आली आहे. नाही तर वर्तमानकाळातील स्थिती अतिशय भयंकर असल्याचे वर्णन एका कवीने केले आहे-

किस रावण की बाहें काटू। किस लंका को जलावू ।
यहा तो हर दर लंका है। हर गली मे रावण है ।
मै राम कहॉ से लावू, मै राम कहॉ से लावू.....

 

- डॉ. हरिदास आखरे

 दर्यापूर, जि. अमरावती.

Web Title: Maryada Purushottam Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.