तरुणीवर प्राणघातक हल्ला करून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:07 PM2018-11-19T16:07:50+5:302018-11-20T13:02:31+5:30

खेट्री (जि. अकोला) :  १८ वर्षीय युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून ५० वर्षीय इसमाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात  १९ नोव्हेंबर रोजी घडली.

man commits suicide after deadly attack on girl | तरुणीवर प्राणघातक हल्ला करून इसमाची आत्महत्या

तरुणीवर प्राणघातक हल्ला करून इसमाची आत्महत्या

Next

विवरा शेतशिवारातील घटना : तरुणी गंभीर जखमी

खेट्री (जि. अकोला) :  १८ वर्षीय युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून ५० वर्षीय इसमाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात  १९ नोव्हेंबर रोजी घडली. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी मृताविरुद्ध युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या विवरा येथील १८ वर्षीय तरुणी आई व बहिणीसोबत सोमवारी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी  खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील नियामत खा सुजात खा (५०)हा तेथे पोहोचला. यावेळी त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीवर सपासप वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी होऊन खाली पडली. हल्ला केल्यानंतर नियामत खा हा पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारच्या शेतातील लोकांनी आरडाओरड करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिथरलेल्या नियामत खा याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे; तसेच तरुणीवर हल्ला केल्याप्रकरणी नियामत खा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी .सी. खंडेराव, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, उप-निरीक्षक जयसिंग पाटील व बाळापूरचे उप-विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.  


हद्दीच्या वादातून प्रेत पाच तास होते पडून 
विवरा शेतशिवारात हा थरार घडल्यानंतर चान्नी आणि पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली; मात्र घटनास्थळ कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, हे निश्चित झाले नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर मृतदेह पाच तास घटनास्थळावरच पडून होता. अखेर हे घटनास्थळ चान्नी पोलिसांच्या हद्दीत असल्याचे निश्चित झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आला. 

 

आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार, याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तसेच तपासात पुढे ज्या बाबी समोर येतील त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 
- सोहेल शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर.  

 

याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे, तसेच मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मृतावर भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- प्रकाश झोडगे, ठाणेदार, चान्नी. 

माझ्या भावाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाली आहे. याप्रकरणी हत्या झाल्याची तक्रार चान्नी पोलिसात २० नोव्हेंबर रोजी देऊ, तसेच पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची गरज आहे. 
- सरदार खा सुजात खा, मृताचा भाऊ . 

Web Title: man commits suicide after deadly attack on girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.