महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन, कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरी शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:49 PM2019-03-02T13:49:18+5:302019-03-02T13:49:24+5:30

अकोला : महावितरणमधील अप्रशिक्षित कंत्राटी कामगाराला विद्युत खांबावर चढविल्यानंतर काम सुरू असतानाच, दोन्ही लाइनमनने विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे कंत्राटी ...

Mahavitaran's engineer, lineman, contractor sentenced ten years jail | महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन, कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरी शिक्षा!

महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन, कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरी शिक्षा!

Next


अकोला: महावितरणमधील अप्रशिक्षित कंत्राटी कामगाराला विद्युत खांबावर चढविल्यानंतर काम सुरू असतानाच, दोन्ही लाइनमनने विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे कंत्राटी कामगाराला जीव गमवावा लागला. त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवित प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आरलँड यांनी शुक्रवारी महावितरणच्या अभियंत्यासह दोन लाइनमन आणि कंत्राटदाराला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला.
न्यू भीमनगरात राहणारे रमेश फकिरा अंभोरे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा विजय अंभोरे हा महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. १९ मार्च २0११ रोजी विजय अंभोरे हा महावितरणच्या कामावर गेला. त्यावेळी आरोपी लाइनमन पंजाबराव भगवंतराव ढाकुलकर (६0), रमेश देभाजी भोयर (५३), कनिष्ठ अभियंता निखिल अविनाश परळीकर (३३) आणि कंत्राटदार योगेश सुरेशराव इंगळे (३६) यांनी त्याला गोरक्षण रोडवरील सरस्वती नगरातील विद्युत रोहित्राजवळील विद्युत खांबावर काम करण्यासाठी पाठविले. विजयने त्यावेळी आरोपींना अप्रशिक्षित असल्याने नकार दिला होता; परंतु त्याला लाइनमन आरोपी पंजाबराव ढाकुलकर व रमेश भोयर यांनी बळजबरीने विद्युत खांबावर चढविले होते. तो विद्युत खांबावर काम करीत असताना, आरोपी लाइनमन यांनी बेजबाबदार आणि निष्काळजीपणे विद्युत प्रवाह सुरू केला. त्यामुळे विजेचा जबर धक्का बसल्याने विजयचा खांबावरच मृत्यू झाला. काही तासांपर्यंत त्याचा मृतदेह विद्युत खांबावरच लटकून होता. या प्रकरणात खदान पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0४ (सदोष मनुष्यवध) भाग २ सह (३४)नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक वसंत सोनोने यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. आरोपींच्या निष्काळजीपणामुळे विजयचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे न्यायालयाने चारही आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी बाजू मांडली.


त्या दिवशी विजयची होती सुटी!
विजय अंभोरे याची १९ मार्च रोजी सुटी होती; परंतु त्याच्या घरातील गॅस सिलिंडर संपल्यामुळे तो गोरक्षण रोडवरील गॅस एजन्सीमध्ये आला होता. तेथून गॅस सिलिंडर घेऊन महावितरण उपविभाग क्र. २ कार्यालयात आला होता. त्याने येथे सिलिंडर ठेवले आणि काही कामासाठी तो बाहेर जाणार होता; परंतु आरोपींनी त्याला विद्युत खांबावरील दुरुस्तीसाठी जाण्यास सांगितले. त्याने माझी सुटी आहे, असे सांगत काम करण्यास नकार दिला होता; परंतु आरोपींनी त्याला बळजबरीने काम करण्यास सांगितले आणि यातच त्याला प्राण गमवावे लागले.

घरची परिस्थिती हलाखीची
विजय हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. आई-वडील, बहिणीची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेला.

 

Web Title: Mahavitaran's engineer, lineman, contractor sentenced ten years jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.