Lok Sabha Election 2019 : तेच उमेदवार, तोच गेम प्लॅन फक्त ‘वंचित’चा तडका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:09 PM2019-03-27T13:09:22+5:302019-03-27T14:33:28+5:30

विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे

Lok Sabha Election 2019: The same candidate, same game plan in Akola | Lok Sabha Election 2019 : तेच उमेदवार, तोच गेम प्लॅन फक्त ‘वंचित’चा तडका!

Lok Sabha Election 2019 : तेच उमेदवार, तोच गेम प्लॅन फक्त ‘वंचित’चा तडका!

- राजेश शेगोकार
अकोला: पश्चिम वºहाडातील अकोला लोकसभा मतदारसंघ सध्या नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा असल्याने तो राज्यात लक्षवेधी ठरला आहे. भाजपाने सलग चार वेळा हा मतदारसंघ जिंकलेला नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला सोडून जिंकलेले नाही अन् काँग्रेसने आंबेडकरांची कोंडी करून विजय मिळविलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत कोणाचाही विजय झाला तर तो विक्रम ठरणार आहे. हा विक्रम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जुनेच उमेदवार रिंगणात उतरविले असून, विजयासाठीचा गेम प्लॅनही जुनाच आहे. फक्त गेल्यावेळी असलेल्या भारिप-बमसंला अधिक विस्तारित करीत ‘वंचित बहुजन आघाडी’ या नावाचा तडका तेवढा नवा आहे. मंगळवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जावरून २०१४ च्याच निवडणुकीमधील तिरंगी लढत नव्याने होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गत १५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यापूर्वी १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपाचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. फुंडकर आणि धोत्रे यांनी या मतदारसंघात विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली असली, तरी सलग चौथा विजय फुंडकरांना मिळविता आला नाही. भाजपाला हादरा देण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. त्या बळावर १९९८ व १९९९ मध्ये मिळालेले यश पुन्हा एकदा मिळविता येईल, अशी काँग्रेसला आशा होती; मात्र आघाडी फिस्कटल्याने अ‍ॅड. आंबेडकर आणि काँग्रेस स्वतंत्रपणे आता रिंगणात उतरले आहेत.
खरे तर राजकारण हे प्रवाही असते. ते स्थिर नसते. त्यामुळे वरवर पाहता २०१९ ची लढाई ही २०१४ सारखीच आहे, असे दिसत असले तरी अनेक मूलभूत बदल झालेले आहेत. भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघावरील आपली पकड थोडीही सैल केलेली नाही. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र ‘नेटवर्क’ आहे. भाजपामध्ये अंतर्गत वाद प्रचंड असला तरी त्याचा पक्षाच्या कामगिरीवर फरक पडला नसल्याचे महापालिका निवडणुकीचे निकाल दर्शवितात; मात्र २०१४ साली असलेली मोदी लाट आता नाही, त्यामुळे भाजपाला विकासाचा मुद्दा घेऊन सामोरे जावे लागेल. भाजपाकडे पाचपैकी चार आमदार असल्यामुळे या मुद्यावर भाजपा वरचढ ठरत असली तरी अर्धवट असलेली विकास कामे अन् रखडलेले प्रश्न याविषयी लोकांमध्ये असलेला सुप्त रोष वाढणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावीच लागणार आहे. नेमक्या याच मुद्याचे भांडवल करीत काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीला आपली रेष मोठी करावी लागणार आहे. काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा रिंगणात उतरविले आहे. त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षातूनही पाहिजे तेवढा उत्साह व्यक्त झाला नाही. याची कारणे वेगळी असली तरी पटेल यांची उमेदवारी एकदमच कमजोर नाही. दोन वेळा खासदार राहिलेले धोत्रे व राष्टÑीय वलय प्राप्त असलेल्या अ‍ॅड. आंबेडकर यांना गेल्यावेळी टक्कर देताना त्यांनी क्रमांक दोनची मते घेतली होती. त्यांना मिळालेली मते ही सरसकट मुस्लीम समाजाचीच होती, असे गृहीत मांडणे धाडसाचे ठरेल.

मोदी लाटेतही काँग्रेसने टिकवून ठेवलेली ती व्होट बँक होती. त्यामुळे यावेळी या व्होट बँकेत किती मतांची भर ते टाकू शकतात, यावरच त्यांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी घातलेला घोळ, पक्षांतर्गत असलेले गटबाजीचे वातावरण, मतभेदांनी वेढलेल्या राष्टÑवादी काँग्रेसची साथ अशा आव्हानांना पेलत पटेल यांना धोत्रे अन् आंबेडकर या दोन्ही मातब्बरांशी सामना करावा लागणार आहे. केवळ अ‍ॅड. आंबेडकरांची कोंडी करण्याच्याच भूमिकेत ते लढले तर काँग्रेसची व्होट बँक हातची जाऊ शकते, त्यामुळे ते कोणती रणनीती आखतात, यावरही त्यांचे अन् काँग्रेसचेही भविष्य अवलंबून आहे. 
या दोन उमेदवारांव्यतिरिक्त उभ्या महाराष्टÑाचे लक्ष अ‍ॅड. आंबेडकरांच्या रणनीतीकडे लागले आहे. लागोपाठ तीनदा पराभव पत्करल्यानंतर १९९८ व १९९९ च्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय ते पुन्हा मिळवू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा आशावाद अतिशय प्रबळ असा आहे. दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी अशा वंचितांचा जागर करीत त्यांनी भारिप-बमसंला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याचे मोठे धाडसी पाऊल उचलले आहे. या नव्या नावामुळे परंपरागत मतांमध्ये भर पडेल, असा त्यांचा कयास आहे. तो खरा ठरला अन् काँग्रेसने केलेली कोंडी ते फोडू शकले, तर मागील मतांच्या तुलनेत त्यांची उडी किती उंच जाते, यावरच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. 
या तीन प्रमुख उमेदवारांवरच निवडणुकीचे रिंगण फिरणार आहे. जुनेच खेळाडू असल्यामुळे एकमेकांना एकमेकांची शक्तिस्थळे आणि कमकुवत दुवे माहिती आहेत. यावेळी आता नव्याने कोणती रणनीती आखून प्रत्येक उमेदवार आपली रेष कशी मोठी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: The same candidate, same game plan in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.