Lok Sabha Election 2019: Competition among the three candidates for the urban constituency | Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांच्या कौलासाठी तीन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा
Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांच्या कौलासाठी तीन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा

- राजेश शेगोकार
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीचेच चित्र पुन्हा उभे ठाकले असल्याने मतविभाजनावरच निवडणुकीचा निकाल फिरणार असल्याचे स्पष्ट आहे. गेल्यावेळी काँग्रेसने खेळलेली खेळी यावेळी कायम आहे तसेच २०१४ ची मोदी लाट आता नाही आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवा पॅर्टन घेऊन रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी शहरे वगळता सर्वच शहरांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला होता. त्यामुळे यावेळी शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे या मतांसाठी काँग्रेस व वंचितमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोल्यासह आठ शहरे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख ९० हजार ८६० मतदारांची नोंद होती. त्यापैकी ३ लाख २६ हजार ५१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६०७ मते संजय धोत्रे यांना तर १ लाख २० हजार ४७४ मते हिदायत पटेल यांना मिळाली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना केवळ ३७ हजार ७७४ मतांवर समाधान मानावे लागले. या पृष्ठभूमीवर यावेळी शहरांचा मागोवा घेतला असता भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरस कामगिरी करून आपला मतदार टिकवून ठेवल्याचे दिसते. अकोला महापालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मतदारांचा प्रातिनिधिक आढावा घेतला तर भाजपाने पालिकेत एकहाती सत्ता आणली आहे. दुसरीकडे गेल्या वेळी १८ नगरसेवकांची काँग्रेस ११ वर आणि ७ नगरसेवकांची भारिप-बमसं अवघ्या ३ नगरसेवकांवर थांबली आहे. त्यामुळे शहरी मतदारांची पसंती मिळविण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा ही आंबेडकर व पटेल यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट असून, भाजपाला आपली मतपेढी टिकविण्याचे आव्हान आहे.

बाळापूर, पातूर, बार्शीटाकळीत काँग्रेस अव्वल
मुस्लीमबहुल असलेल्या बाळापूर शहरात काँग्रेसने भाजपापेक्षा तिप्पट मते घेतली होती, तर पातूर व बार्शीटाकळीमध्येही काँग्रेस अव्वल होती. या तीनही शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था यावेळीही काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे या मतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘हात’ मारण्याचे लक्ष्य आहे.
अकोला पश्चिम तिन्ही उमेदवारांचे ‘लक्ष्य’
अकोला शहरातील पश्चिम परिसर हा भाजपाचा गड असला तरी काँग्रेसनेही येथे तोडीस तोड मते घेऊन आपली ताकद अधोरेखित केली होती. विशेष म्हणजे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना शहरातून मिळालेल्या मतांमध्ये सर्वाधिक मते अकोला पश्चिममध्येच होती. त्यामुळे अकोला पश्चिम हा तीनही उमेदवारांसाठी ‘लक्ष्य’ ठरणार आहे.


Web Title: Lok Sabha Election 2019: Competition among the three candidates for the urban constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.