मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:21 PM2019-06-03T16:21:38+5:302019-06-03T16:22:09+5:30

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे.

Leopard found dead in the  Melghat Tiger project | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

googlenewsNext

- विजय शिंदे
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोटवन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना २ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी जंगलात रवाना झाले होते.
अकोटलगत मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अतिसंरक्षित आहे. या अकोट वन्यजीव विभागातील धारगड वनपरिक्षेत्र अंतर्गत गुरगीपती वर्तुळ अंतर्गत खंड क्रमांक ९१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना रविवारी गस्ती दरम्यान बिबट अर्धवट कुजलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी धारगड जंगलात जाऊन शवविच्छेदन केल्याची माहिती समोर येत आहे.
बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने किमान तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्याचा मृत्यू पाण्याअभावी की उष्मघातामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मेळघाट क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी बिबट मृत्यूप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला असल्याचे कळते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. गत काही महिन्यांपासून ३ वाघ व ३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु या मृत्यूच्या घटना वन्य जीवप्रेमींमध्ये चिंताजनक ठरत आहेत.
 
अकोट वन्यजीव विभाग धारगड परिक्षेत्रातील जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. आमचे वनाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी जंगलात पाठविण्यात आले आहे. सध्यातरी मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही.
-ओ. टी. बेऊला,
उपवनसंरक्षक,
वन्यजीव विभाग अकोट.

 

Web Title: Leopard found dead in the  Melghat Tiger project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.