Koregaon Bhima: Prime Minister Modi's symbolic statue burnt in Akola | कोरेगाव भीमा: अकोल्यात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

ठळक मुद्देसंतत्प अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.अशोक वाटीका चौकात महिलांनी रस्त्यावर ठीय्या आंदोलन केले. तुकाराम चौक परिसरातील भेळ सेंटर, आमलेटच्या हातगाड्यांची तोडफोड केली.


अकोला : कोरेगाव भीमा येथील शहरात कडकडीत बंद पाळला जात असताना आंबेडकरी अनुयायी रस्त्यारस्त्यांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत आहेत. संतत्प अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. आंदोलनात महिलांचाही सहभाग असून, अशोक वाटीका चौकात महिलांनी रस्त्यावर ठीय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आंबेडकरी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


जुने बसस्थानकाजवळ वाद
आंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी टॉवर चौकाकडून मोहम्मद अली रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेल्या दुकाने बंद करण्यास सांगितले. परंतु काही दुकानदारांनी नकार दिल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. प्रकरण चिघळणार असल्याचे पाहून, पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे वाद निवळला.

आंदोलनात भारिपचे पदाधिकारी सहभागी
कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी केलेल्या बंद आंदोलनामध्ये भारिप बमसंचे आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, प्रदीप वानखडे, जि.प. माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, मनपाचे माजी गटनेता गजानन गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जीवन डिगे, मोहन लाखे, अ‍ॅड. छोटू सिरसाट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष सचिन शिराळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोरेगाव भीमा घटनेचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी जनतेच्या बंद आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा देत, कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. अशोक वाटीका चौकातील आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले, चेतन ढोरे, मयुर पाटील, नितीन सपकाळ, आनंद पाटील, अमित ठाकरे, शुभम घिमे आदी सहभागी झाले होते.


राऊंड परिसरातील घरांवर दगडफेक
काही युवकांनी तुकाराम चौक परिसरातील भेळ सेंटर, आमलेटच्या हातगाड्यांची तोडफोड केली. एवढेच नाहीतर राऊंड रोडवरील कोकाटे, बिसेन आणि धस बिल्डर यांच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे नागरीक भयभित झाले होते. नागरीकांनी घराची दरवाजे, खिडक्या बंद करून घरात राहणेच पसंत केले.