ठळक मुद्देअकोला, आकोट, तेल्हारा, मुर्तीजापूर, पातुर, बाळापूर, बार्शीटाकळी या मोठ्या शहरांसह या ताालुक्यांमध्यील गावांमध्ये बाजारपेठा बंद राहिल्या. राजकीय पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.आकोट-शेगाव मार्गावरील निंबा फाटा व अंदुरा, अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्राम, पातुर तालुक्यातील दिग्रस, तुलंगा बु. येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तो रोको आंदोलन केले.

अकोला: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतीसाद देताना अकोला शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. राजकीय पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, आकोट, तेल्हारा, मुर्तीजापूर, पातुर, बाळापूर, बार्शीटाकळी या मोठ्या शहरांसह या ताालुक्यांमध्यील गावांमध्ये बाजारपेठा बंद राहिल्या. अडगाव, आलेगाव, हिवरखेड, कुरुम, बोरगाव मंजू या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.
महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी उत्स्फुर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर पैलपाडा, वणी रंभापूर, डोंगरगाव या ठिकाणी रास्तो रोको करण्यात आले. यामुळे शेकडो वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती. आकोट-शेगाव मार्गावरील निंबा फाटा व अंदुरा, अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्राम, पातुर तालुक्यातील दिग्रस, तुलंगा बु. येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तो रोको आंदोलन केले. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतल गोणापूर बसस्थानकावर संतप्त आंदोलकांनी बसची तोडफोड केली. निंबा फाट्यावर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.अकोला शहरात कडकडीत बंद
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच शहरातील आंबेडकरी जनतेसह भारिप बमसंच्या पदाधिकारी कार्यकते रस्त्यावर उतरले. हातात पंचशील व नीळा झेंडा घेवून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून निषेध करीत होती. गटागटाने आंबेडकरी कार्यकर्ते युवक, महिला रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करीत होते. शहरातील जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, परिसरातील शेकडो युवकांनी मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकलवर फिरून युवक सुरू असलेले दुकाने बंद करताना दिसून येत होते. युवकांचे वेगवेगळे गट सिव्हील लाईन चौकात गोळा होवून मोठ्या संख्येने मुख्य डाकघर चौकाजवळ आले. याठिकाणी जय भीम...अशा घोषणा युवकांनी दिल्या. त्यानंतर युवकांचा मोर्चा टॉवर चौकातून मार्गक्रमण करीत, मोहम्मद अली चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील जयप्रकाश नारायण चौकात आला. त्यानंतर हे युवक अशोक वाटीका येथे आले. याठिकाणी हजारो युवक, महिला व पुरूष गोळा झाले. हा जमलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी चौकात आल्यावर याठिकाणी युवकांनी नारेबाजी केली.

शहरातील शाळा, महाविद्यालये बंद
महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी रात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सकाळपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होते. पालकांच्या सोयीसाठी शाळा, महाविद्यालयांसमोर बंदचे फलक लावण्यात आले होते.

ठिकठिकाणी दगडफेक
शहरात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या. सिंधी कॅम्प, खदान परिसरासोबतच तुकाराम चौक, इन्कमटॅक्स चौकातील दुकानांवर आंदोलकांनी दगडफेक केली. तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणाºया राऊंड रोडवरील आंदोलकांनी दगडफेक करून हॉटेल राजे व इतर प्रतिष्ठानांची तोडफोड केली.


ठिकठिकाणी मोर्चा
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यातील तालुक्यांच्या शहरांसह मोठ्या गावांमध्ये निषेध मोर्चा काढून बाजारपेठा बंद करण्याचे आवाहन केले.
 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सर्व मुख्य रस्त्यांवर पोलिस पेट्रोलिंग करीत आहेत.

 


Web Title: Koregaon Bhima: Akola district, stop the roads in many places
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.