किडनी तस्करी रॅकेट: सीआयडी आरोग्य विभागात आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:15 PM2019-02-19T14:15:08+5:302019-02-19T14:18:41+5:30

अकोला: अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत अडीच वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असला तरी आरोग्य विभागाचे असहकार्य असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधांतरी आहे.

 Kidney smuggling racket: accusations in the CID and health department | किडनी तस्करी रॅकेट: सीआयडी आरोग्य विभागात आरोप-प्रत्यारोप

किडनी तस्करी रॅकेट: सीआयडी आरोग्य विभागात आरोप-प्रत्यारोप

Next

- सचिन राऊत

अकोला: अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत अडीच वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असला तरी आरोग्य विभागाचे असहकार्य असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधांतरी आहे. सीआयडी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तपासावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सीआयडी आरोग्य विभागाचा अहवाल मागत असून, आरोग्य विभागाने सीआयडीचा अहवाल आल्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची भूमिका घेतली.
सीआयडीने किडनी तस्करी रॅकेटमधील डॉक्टर आणि रुग्णालयांची भूमिका तपासण्यासाठी आरोग्य विभागाचा अहवाल मागितला असता त्यांचे असहकार्य असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोणतीही माहिती येत नसल्याने, तपास थांबल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणणे आहे. या प्रकरणात डॉक्टरांच्या भूमिकेबद्दल राज्य आरोग्य विभागाकडून योग्य तो अहवाल आला नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सतत स्मरणपत्रांनंतरही अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने उत्तर दिलेले नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांना एक स्मरणपत्र पाठवले. त्यानुसार रुग्णालये, पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा आणि डॉक्टरांनी प्रयोगशाळेची तपासणी केली किंवा नाही, ते स्पष्ट करावे व काय प्रक्रिया केली याचाही खुलासा करण्यासाठी सीआयडीने पत्र पाठविले आहे. यावर राज्य आरोग्य खात्याने सीआयडीचा आरोप नाकारत हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करता येईल, सीआयडीकडून स्मरणपत्रे दिले असले तरी त्याकडे दुर्लक्ष नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आरोग्य विभागाला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गुंतलेल्या डॉक्टर किंवा रुग्णालयांबद्दलचा अहवाल पाठविण्याची गरज आहे, जेणेकरून आरोग्य विभाग आरोपींची चौकशी करून हॉस्पिटल बंद करणे आणि डॉक्टर आणि रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करता येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. २०१८ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या माजी आरोग्य संचालक डॉ. कांबळे यांनी पोलिसांना अकोला किडनी रॅकेटबद्दल विस्तृत अहवाल पाठविण्यासाठी एक पत्र पाठविले होते, त्यानुसार जे डॉक्टर व हॉस्पिटल यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करता येईल, असे स्पष्ट नमूद आहे; मात्र आरोग्य विभाग सीआयडीच्या अहवालावर अडून असून, सीआयडी आरोग्य विभागाने डॉक्टर व रुग्णांलयांची काय तपासणी केली, याचा अहवाल मागत आहे. या दोन यंत्रणेच्या आरोप-प्रत्यारोपामध्ये गंभीर असलेल्या अकोला किडनी तस्करी रॅकेटचा तपासात मात्र खंड निर्माण होत आहे.
तर महाराष्ट्र आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. सतीश पवार यांनीही आरोप मागे घेतले की आरोग्य अधिकारी सीआयडीशी सहकार्य करीत नाहीत. आम्ही आशा केली की त्यांनी हे प्रकरण सोडवावे,अकोला प्रकरणात तेथे प्रगती झाली नाही आणि आरोग्य विभाग व सीआयडी यांच्यात काही विशिष्ट संवाद आहेत जे पुढे आणि पुढे जात आहेत.


डॉक्टर मोकाट हॉस्पिटलही सुरूच!

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणात केवळ अत्यंत खालच्या स्तरावरील दलाली करणाºयांवर कारवाई झालेली आहे. २ डिसेंबर २०१५ पासून अद्यापपर्यंत एकाही डॉक्टरवर कारवाई झाली नसून, ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले, त्या हॉस्पिटलवरही कारवाई झालेली नसल्याचे वास्तव आहे. यावरून लोकप्रतिनिधींकडून या प्रकरणातील डॉक्टर व हॉस्पिलटवर कारवाई न करण्यासाठी दबाव येत असल्याची माहिती आहे.
 
सुरुवातीपासूनच आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
महाराष्ट्र आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. अकोला पोलीस तपास करीत असताना वारंवार पत्र दिल्यानंतरही आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी विदेशात सुटीवर गेले होते. अनेक दिवस सुटीवर असल्यामुळे आरोपी असलेल्या डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाचे तांत्रिक मुद्दे स्पष्ट करण्यात पोलिसांना अडचण आली होती. त्यानंतर आता सीआयडी या प्रकरणाचा तपास करीत असतानाही आरोग्य विभागाने सीआयडीकडेच बोट दाखविले आहे. 
 
हिरानंदानीचा तपास आटोपला
मुंबइतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेल्या किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी पूर्ण केला आहे; मात्र अकोला किडनी तस्करी रॅकेट प्रकरणात तेथे प्रगती झाली नाही आणि आरोग्य विभाग व सीआयडी यांच्यात काही विशिष्ट संवाद अडल्याने या प्रकरणाचा तपासही थंड बस्त्यात आहे. दोन्ही विभागाने तांत्रिक मुद्दे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुढे सरकण्याची शक्यता आहे.

Web Title:  Kidney smuggling racket: accusations in the CID and health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.