लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : तालुक्यातील अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यासंमोर घागरी फोडून आपल्या व्यथा मांडल्या.
जोगलखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या व ३00 लोकांची वस्ती असलेल्या अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना नाही. गावात पाण्याचे इतर स्रोतही नसल्याने ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चार ते पाच कि.मी. अंतरावरून ग्रामस्थ मिळेल त्या साधनाने पाणी आणत आहेत. गावात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत; मात्र त्याकडे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.
गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ४ ते ५ कि.मी. अंतरावरून पाइपलाइन टाकण्याची गरज आहे; मात्र निधी नसल्याने गावात पाइपलाइन टाकण्यात आलेली नाही. सध्या गावात भास्कर गावंडे यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाईचे चटके सहन करणार्‍या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता मिलिंद जाधव, सरंपच गीता भरणे, उपसरपंच संगीता वाघ, सचिव काळे यांच्यासमोर महिलांनी घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला, तसेच पाणीपुरवठय़ावर उपाययोजना करण्याची मागणी केली.