ठळक मुद्दे भोंदूबाबास तीन वर्षांचा कारावाससंभाजी ब्रिगेडच्या लढय़ाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बाश्रीटाकळी तालुक्यातील मांडोली येथे अनेक वर्षांपासून माणिक महाराज ऊर्फ माणिक कसणदास जाधव हा देवीच्या मंदिरात अमावस्या व पौर्णिमेला दरबार भरवून अंगात देवी येत असल्याची बतावणी करून भाविकांना लुटत होता. त्याच्या कारनाम्यांचा संभाजी ब्रिगेडने भंडाफोड करून त्याचा भोंदूपणा जनतेसमोर उघड केला. त्याच्याविरुद्ध बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात राज्यातील जादूटोणा कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला. चार वर्षांनंतर न्यायालयाने या भोंदूबाबाला जादूटोणा कायद्यांतर्गत दोषी ठरवित, त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. जादूटोणा कायद्यांतर्गत राज्यातील पहिला निकाल असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी शुक्रवारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत केला. 
अनेक वर्षांपासून माणिक महाराज हा नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन, त्यांना लुबाडत होता. १४ मे २0१४ रोजी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष डॉ. पारधी यांनी, त्याचा भोंदूपणा उघड केला आणि पोलिसात भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दिली. तत्कालीन ठाणेदार देवराज खंडेराव यांनी भोंदूबाबाविरुद्ध राज्यातील पहिला जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणात साक्षीदार म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, गजानन चोपडे, कुलदीप तराळे, पातूर तालुकाध्यक्ष प्रदीप काळपांडे यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले होते. पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दरम्यान, माणिक महाराजाने साक्षीदारांवर दबाव टाकण्यासोबतच त्यांच्यावर हल्ले करण्याचेदेखील प्रयत्न केले. अखेर न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध साक्ष व पुरावे सबळ असल्याने, न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. राज्यामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. संभाजी ब्रिगेडने यापूर्वीही जिल्हय़ातील अनेक भोंदूबाबा व ज्योतिषांना पोलिसांच्या सहकार्याने पकडून दिले आहे. हे गुन्हे प्रलंबित आहेत. सहा महिन्यांच्या काळात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे आणि ते प्रकरणसुद्धा संभाजी ब्रिगेडने अकोट फैल पोलीस ठाण्यात इच्छाधारी महाराजाविरुद्धचे प्रकरण दाखल केले. जादूटोणा कायदा लागू करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे मोठे योगदान आहे, अशी माहिती पंकज जायले यांनी देत, आता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात भोंदूमहाराज, ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ यांना शोधून काढून त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार आहे. नागरिकांनीसुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी न घालता, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या कार्यासाठी मदत करावी, असेही जायले यांनी स्पष्ट केले.