अकोट : अकोट शहराचा धार्मिक उत्सवाचा भाग असलेल्या नंदीपेठ या परिसरात दारू दुकान टाकण्याचे घाट रचले जात आहेत. अशातच नव्याने सुरू झालेल्या दारू दुकानामधील दारू दुकानाला आग लागल्याने नासधूस झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री घडली. या भागात दारूची दुकाने लागू नये, याकरिता येथील महिला व नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी विरोध करीत संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत, हे विशेष.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानांना कुलूप लागले आहे. त्यामुळे दुकानदारांनी ५00 मीटर दूरवरील जागा शोधणे सुरू केले आहे. अशातच नंदीपेठ परिसरातील शेत सर्वे नं. २८८/ ३ व २८८ या या ले-आऊटमध्ये दुकाने सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता बांधकामसुद्धा करण्यात आले आहे. १७ जून रोजी या ठिकाणी एक दुकान सुरू झाले होते; परंतु अचानक रात्री या दुकानातील दारूच्या बॉक्सला लाग लागली. याबाबत मध्यरात्री अग्निशमन दलाला माहिती मिळाल्याने त्यांनी या ठिकाणी जाऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार देण्यास दारू दुकान मालक जयस्वाल यांनी असर्मथता दर्शविली असली, तरी राजू खुमकर यांनी नासधूस झाल्याच्या दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध अदखलपात्र नोंद घेण्यात आल्याचे ठाणेदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले. नंदीपेठ परिसरात दारूची दुकाने सुरू होत असल्याने येथील नागरिकांमध्ये संताप आहे. त्यांनी सुरू असलेल्या अवैध बांधकामाबाबत नगर परिषद, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग, उपविभागीय अधिकारी, शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, या ठिकाणी दारू दुकाने सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी शेकडो महिला-पुरुषांच्या सहीनिशी केली होती. येथील नागरिकांच्या मागणीचा व धार्मिक भावनांचा विचार न करता एक दुकान या ठिकाणी सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.