बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र भोवले; विधी, न्याय मंत्रालयाच्या विधी सल्लागाराची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:27 PM2018-10-14T14:27:33+5:302018-10-14T14:28:13+5:30

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे मुंबई येथील विधी व न्याय मंत्रालयात सहायक विधी सल्लागार म्हणून नोकरी मिळविणाऱ्या विधिज्ञ नरेंद्र पांडे याला अटक करण्यात आली.

Fake certificates; Legal Advisor to the Ministry of Justice in jail | बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र भोवले; विधी, न्याय मंत्रालयाच्या विधी सल्लागाराची कारागृहात रवानगी

बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र भोवले; विधी, न्याय मंत्रालयाच्या विधी सल्लागाराची कारागृहात रवानगी

Next

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे मुंबई येथील विधी व न्याय मंत्रालयात सहायक विधी सल्लागार म्हणून नोकरी मिळविणाऱ्या विधिज्ञ नरेंद्र पांडे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
नरेंद्र अरविंद पांडे याने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून ८० टक्के दिव्यांगत्व असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळविले. या आधारावर मुंबई येथील विधी व न्याय मंत्रालयात सहायक विधी सल्लागार म्हणून नोकरी मिळविली होती. यासंदर्भात मुंबईचे ज्येष्ठ विधी सल्लागार पंकज कपूर यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अकोला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना चौकशीचा आदेश दिला. यावरून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी चौकशी केली असता, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले. त्यानुसार सिटी कोतवाली पोलिसांनी नरेंद्र पांडेविरोधात फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.

 

Web Title: Fake certificates; Legal Advisor to the Ministry of Justice in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.