Due to funding of the road, pressure for the contractor's pay; G. Take action against Srikanth! | रस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा!
रस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा!

ठळक मुद्दे‘डीपीसी’ सभा : रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी करून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत केली.
निमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला. जिल्हा नियोजन समितीची मंजुरी न घेता रस्त्याचे काम करण्यात आल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी ‘डीपीसी’च्या सभेत उपस्थित केला. ‘डीपीसी’ची मान्यता नसताना तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मौखिक आदेशावरून रस्त्याचा निधी वळता करण्यात आला व दुसर्‍याच रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली. तसेच जिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे सन २00८-0९ मध्ये बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्यापही लाभार्थींना मिळाला नसून, घरकुले रिकामी पडली आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थींना घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सभेत केली. या मुद्यावरील चर्चेत घरकुलांचा लाभ लाभार्थींना देण्यात आला नसताना संबंधित कंत्राटाराचे देयक देण्यासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याची बाब समोर आल्याने, यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया व आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली.

‘डीपीसी‘ची मान्यता न घेता, तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मौखिक आदेशानुसार निमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी दुसर्‍या रस्त्याच्या कामावर वळता करण्यात आला. त्यामुळे मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम बदलण्यात आल्याने यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी ‘डीपीसी’च्या सभेत केली.
-आ. रणधीर सावरकर.

जिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नाही. त्यामुळे घरकुलांचा लाभ लाभार्थींना तातडीने देण्यात यावा आणि घरकुलांचा लाभ लाभार्थींना मिळाला नसताना, कंत्राटदाराचे देयक देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याचे मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यांनी मान्य केले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ‘डीपीसी’ सभेत केली.
-आ.गोपीकिशन बाजोरिया.

 


Web Title: Due to funding of the road, pressure for the contractor's pay; G. Take action against Srikanth!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.