स्वप्नही पाहिले नव्हते; पण घर मिळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:55 PM2018-10-20T14:55:55+5:302018-10-20T14:56:06+5:30

- संतोष येलकर अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’(व्हीसी) संवाद साधला. ...

The dream was not seen; But got home! | स्वप्नही पाहिले नव्हते; पण घर मिळाले!

स्वप्नही पाहिले नव्हते; पण घर मिळाले!

Next

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’(व्हीसी) संवाद साधला. ‘व्हीसी’द्वारे चर्चेत अकोला जिल्ह्यातील २३ लाभार्थींनी सहभाग घेतला. मजुरीवरच पोट भरावे लागत असल्याने, पक्के घर होईल, असे स्वप्नातही वाटले नाही; मात्र प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने, माझे घराचे स्वप्न साकारले आहे, अशा शब्दात घरकुल मिळाल्याचा आनंद आदिवासी कुटुंबातील लाभार्थी निर्मला सोळंके यांनी ‘व्हीसी’नंतर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथून ‘व्हिडिओ कॉन्फन्सिंग’द्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थींसोबत चर्चा केली. ‘व्हीसी’द्वारे पंतप्रधानांसोबत चर्चेसाठी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ लाभार्थींना जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित लाभार्थींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘व्हीसी’मध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील काही लाभार्थींसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला. वेळेअभावी अकोला जिल्ह्यातील लाभार्थींची थेट पंतप्रधानांसोबत चर्चा होऊ शकली नाही; मात्र राज्यातील वेगवेगळ्या भागातील लाभार्थींसोबत पंतप्रधानांनी ’व्हीसी’द्वारे केलेल्या चर्चेत सहभाग झाल्याचा आनंद जिल्ह्यातील लाभार्थींनी अनुभवला. या ‘व्हीसी’मध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबाजार येथील आदिवासी कुटुंबातील लाभार्थी निर्मला रंगराव सोळंके यांनी सहभाग घेतला होता. आर्थिक परिस्थिती प्रचंड गरिबीची असल्याने, कुडामातीच्या घरात राहून शेतमजुरीचे काम करून पोट भरावे लागत असताना, विटा-सिमेंटचे पक्क घर होईल, असे स्वप्नातही वाटले नाही; मात्र प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गत सप्टेंबर अखेरपर्यंत माझ्या घराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे पक्क्या घराचे माझे स्वप्न साकारले आहे, असे आदिवासी कुटुंबातील लाभार्थी निर्मला सोळंके यांनी ‘व्हीसी’नंतर ’लोकमत’शी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांसोबत चर्चेसाठी लाभार्थींना करावी लागली प्रतीक्षा!
‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’मध्ये सहभागी जिल्ह्यातील लाभार्थींना पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची उत्कंठा लागली होती. अमरावती विभागातील काही लाभार्थींसोबत पंतप्रधानांनी चर्चा केल्यानंतर ‘व्हीसी’ची वेळ संपुष्टात आली. त्यामुळे ‘व्हीसी’मध्ये सहभागी जिल्ह्यातील लाभार्थींना पंतप्रधानांसोबत चर्चा करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागली.


‘व्हीसी’मध्ये ‘या ’ लाभार्थींनी घेतला सहभाग!
पंतप्रधानांसोबत ‘व्हीसी’मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील २३ लाभार्थीनी सहभाग घेतला. त्यामध्ये अभिमन्यू मोहोड , निरंजन डामरे (पाथर्डी), गुलाम अनिस, संतोष ढोकणे, शेख मस्तान (गायगाव), रामकृष्णा तायडे (किनखेड), शेख इसार शेख सुभान, भास्कर अंभोरे, गुलाम दस्तगीर देशमुख (आगर), इंदू डोंगरे (किनखेड), निर्मला सोळंके (शेलूबाजार), राजू अरुळकार (कान्हेरी सरप), रमा अनभोरे, स्नेहा अनभोरे (नागोली), बळीराम भिसे (पाथर्डी), अनिल देऊळकर, प्रदीप व्यवहारे, शंकर पद्मने, वासुदेव पद्मने (अकोलखेड), सुभाष शेंडे , रामराव सुरवाडे व राहुल सुरवाडे (भंडारज) इत्यादी लाभार्थींचा समावेश होता.

 

कुडामातीच्या घरात राहून मजुरीवर पोट भरताना पक्क्या घराचे स्वप्नही पाहिले नव्हते; परंतु प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घराचे काम गेल्या महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे पक्क्या घराचे माझे स्वप्न साकार झाले. लाभार्थींसोबत पंतप्रधान मोदी यांनी साधलेला संवाद मी अनुभवला.
- निर्मला सोळंके, घरकुल लाभार्थी, शेलूबाजार, ता. मूर्तिजापूर.

 

 

Web Title: The dream was not seen; But got home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.