'DPC' election: 15 candidates filed for nomination papers | ‘डीपीसी‘ निवडणूक : महापौरांसह १५ उमेदवारांचे अर्ज दाखल

ठळक मुद्देअर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र टापरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘डीपीसी’च्या १४ जागांच्या निवडणुकीसाठी २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गत २ डिसेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी ७ डिसेंबर रोजी अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांच्यासह १४ उमेदवारांनी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नरेंद्र टापरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. ६ डिसेंबर रोजी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ‘डीपीसी’ १४ जागांच्या निवडणुकीसाठी ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या १५ वर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांच्या संख्येत वाढ होणार आहे. 

मतदारसंघनिहाय असे दाखल झाले उमेदवारी अर्ज!
‘डीपीसी’च्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघातून १४ उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महानगरपालिका मतदारसंघात नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गातून रंजना विंचनकर, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शारदा ढोरे, शीतल गायकवाड, अनुसूचित जाती (स्त्री) प्रवर्गातून आम्रपाली उपरवट, सर्वसाधारण प्रवर्गातून विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून अनिल मुरुमकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपालिका मतदारसंघातून ओबीसी स्त्री प्रवर्गात  रेशमा अंजुम अफजलखॉ, गंगा चंदन, सर्वसाधारण प्रवर्गातून राजेश खारोडे व कैलास ढोकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून सरला मेश्राम, अनुसूचित जमाती प्रवर्गातून श्रीकांत खोने व सर्वसाधारण प्रवर्गातून संजय आष्टीकर इत्यादी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.