'Devrupa' pressing factory severe fire in Murthijapur; 32 lakh cotton sacks | मूर्तिजापुरात ‘देवकृपा’ प्रेसिंग फॅक्टरी भीषण आग; ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक 

ठळक मुद्दे३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता लागली आग मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर येथील अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात 

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: येथून जवळच असलेल्या सिरसो (मूर्तिजापूर) तपे हनुमान मंदिरानजीकच्या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत ३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता आग लागली. या आगीत ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक झाल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरसो (मूर्तिजापूर) शिवारात येणार्‍या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत व्यंकटेश वेस्ट प्रोसेसचा २५0 गठाणी कापसाचा माल होता. जयकिशन डागा यांच्या मालकीच्या असलेल्या कापसाच्या या गठाणीस ३१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता अचानक आग लागून प्रेसिंग फॅक्टरीत ठेवलेला माल जळून राख झाला. आगीत ३२ लाख रुपयांचा माल जळाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळावर भेट देऊन आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा प्रेसिंग फॅक्टरीत २५0 गठाणी कापूस होता. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल कर्मचार्‍यांसह फॅक्टरीतील कामगारांनी मोलाचे कार्य केले. घटनास्थळी मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. वृत्त लिहिस्तोवर आग कशाने लागली, याचे कारण कळू शकले नाही.