अक्षय तृतीयेमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:35 PM2019-05-08T13:35:41+5:302019-05-08T13:56:43+5:30

सराफा बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्यामुळे मंगळवारी सराफा दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.

Crores of turnover in the market due to Akshaya Tritiya | अक्षय तृतीयेमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल

अक्षय तृतीयेमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Next
ठळक मुद्देसराफा व्यावसायिकांनीसुद्धा ग्राहकांसाठी खास अक्षय तृतीयेनिमित्त आॅफर सुरू केल्या. शोरूममधून ५00 च्यावर दुचाकी व ५0 च्यावर चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली.

अकोला: अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या शुभमुहूर्तावर खरेदी करणे भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते. अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठेत उत्साह होता. सराफा बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्यामुळे मंगळवारी सराफा दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. याशिवाय दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूममध्येसुद्धा मोठी गर्दी दिसून आली. एकंदरीतच मंगळवारी बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त आणि लग्नसराईमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असल्यामुळे सराफा व्यवसायी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूम चालकांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना बाजारात आणल्या. सराफा व्यावसायिकांनीसुद्धा ग्राहकांसाठी खास अक्षय तृतीयेनिमित्त आॅफर सुरू केल्या. ग्राहकांनी काही दिवस आधीपासून सोने खरेदीसाठी बुकिंग करून ठेवली होती. मागील काही वर्षात सोने खरेदीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सराफा बाजारासोबतच इलेक्ट्रॉनिक व वाहन खरेदीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. सुमार दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात मंदीची स्थिती होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती; परंतु यंदा बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.

५00 च्यावर दुचाकी, ५0 च्यावर कारची विक्री!
शहरातील दुचाकी, चारचाकीच्या शोरूममध्ये मंगळवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी खरेदी करण्यासाठी अनेकांनी आधीपासूनच बुकिंग करून ठेवली होती. मंगळवारच्या मुहूर्तावर शहरातील शोरूममधून ५00 च्यावर दुचाकी व ५0 च्यावर चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आल्याची माहिती शोरूम चालकांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठी खरेदी
अक्षय तृतीयेनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी आकर्षक आॅफर ठेवल्या होत्या. एकाच पॅकेजमध्ये तीन ते चार वस्तूंची आॅफर देण्यात आली होती. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर अकोलेकर ग्राहकांनी एलईडी, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मायक्रोओवनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी खरेदी केली.

का केल्या जाते सोन्याची खरेदी?
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केले तर घरात कायम संपत्ती येते. संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी धारणा आहे. संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला संपत्तीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व हिंदू धर्मात आहे. त्यामुळे नागरिकांचा या दिवशी सोने खरेदीकडे अधिक कल दिसून येतो.

 

Web Title: Crores of turnover in the market due to Akshaya Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.