काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:27 PM2019-07-12T13:27:30+5:302019-07-12T13:27:34+5:30

मुंबईतील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी ‘विचार मंच’च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात चाचपणी सुरू केली आहे.

The Congress leader try in Akola | काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी

काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याची अकोल्यात चाचपणी

Next

अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा सामना करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने इतर समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केल्यानंतर आता मुंबईतील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी ‘विचार मंच’च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोट मतदारसंघ केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसची पुरती दाणादाण उडविल्याचे चित्र निकालाअंती समोर आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट ओसरल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. हा दावा फोल ठरवित भाजपने पुन्हा केंद्रातील सत्ता ताब्यात घेतली. भाजपच्या घोडदौडीचा सर्वच विरोधी पक्षांनी धसका घेतल्यामुळे की काय, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला मात देण्याच्या विचारातून समविचारी पक्षांनी विविध प्रयोग राबविण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. तत्कालीन काँग्रेसच्या कार्यकाळात मुंबईतील माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांनी त्यांचा मोर्चा थेट पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याकडे वळविल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाला बाजूला सारत बाबा सिद्दिकी ‘विचार मंच’ या बॅनरखाली जिल्ह्यात राजकीय प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे तूर्तास दिसत आहे. आगामी आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बाबा सिद्दिकी यांनी उद्या शहरात बैठकीचे आयोजन केल्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

तीन मतदारसंघ ‘लक्ष्य’
विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्ष, संघटनेला सोबत घेऊन नवीन राजकीय प्रयोग करण्याची तयारी सिद्दिकी यांच्या ‘विचार मंच’कडून केली जात असल्याची माहिती आहे. यामध्ये अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघांना ‘लक्ष्य’ केले जाणार आहे. राजकीय खेळी यशस्वी करण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीतील पदाधिकाऱ्यांना एका बॅनरखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काँग्रेसमध्ये दुफळी
जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय पेरणी केली जात असल्याची बाब स्थानिक पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागली आहे. तिकिटाच्या अपेक्षेने मागील अनेक वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करणाºया इच्छुक पदाधिकाºयांनी यासंदर्भात थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अवगत केल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: The Congress leader try in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.