‘बीटी’च्या सहा कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:31 AM2017-11-23T02:31:27+5:302017-11-23T02:34:53+5:30

जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

Complaint against six companies of BT | ‘बीटी’च्या सहा कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार!

‘बीटी’च्या सहा कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार!

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना आक्रमक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी बीटी कपाशीच्या सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणी केलेल्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बीटी कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बीटी कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात दोषी संबंधित बीटी कपाशी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत शिवसेना पदाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम कार्यालयात उपस्थित नसल्याने, शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांच्याकडे मागणी रेटून धरली. जोपर्यंत दोषी बीटी कपाशी बियाणे कंपन्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली. त्यामुळे बीटी कपाशी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद दिनकर जंजाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात छेडण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात  निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अकोला शहरप्रमुख (पूर्व ) अतुल पवनीकर, शहरप्रमुख (पश्‍चिम) राजेश मिश्रा, प्रदीप गुरुखुद्दे, तालुकाप्रमुख विकास पागृत, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, दिनेश सरोदे, उप शहरप्रमुख अभिषेक खरसाडे, किरण अवताडे, केदार खरे, सुनील दुर्गीया, लक्ष्मण पंजाबी, अविनाश मोरे, योगेश गीते, नकुल ताथोड, उमेश गावंडे, विनायक गावंडे, सुभाष नागे, नंदू चव्हाण, संतोष नांदूरकर, दहीगाव (अवताडे) येथील शेतकरी पुरुषोत्तम अवताडे, नीलेश जुंबळे, विठ्ठल पवार, योगेश अवताडे, योगेश जुंबळे, विठ्ठल अवताडे, सिद्धार्थ पहुरकर, दिलीप सावळे, अश्‍विन नवले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१0९८ तक्रारी; २१६ तक्रारींचा अहवाल शेतकर्‍यांची फसवणूक, कृषी विभागाची तक्रार
बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तालुका स्तरावर  १ हजार ९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २१६ तक्रारींच्या अहवालानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात कपाशी पिकाची पाहणी केली असता, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांचे  नुकसान झाल्याचे दिसून येते. बीटी कपाशी बीजी-२ उत्पादक कंपन्यांनी संबंधित बियाणे अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकर्‍यांना विक्री करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली असल्याने  महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २00९ चे उल्लंघन झाले आहे. त्यानुषंगाने  संबंधित सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.

Web Title: Complaint against six companies of BT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.