सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठ्ठी स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 06:44 PM2019-07-05T18:44:58+5:302019-07-05T18:45:02+5:30

अकोला: अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांना आमदार होण्याची घाई झाली आहे.

Competition for candidacy in all the parties! | सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठ्ठी स्पर्धा!

सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठ्ठी स्पर्धा!

Next

 - राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांना आमदार होण्याची घाई झाली आहे. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आतापासूनच आहे. ही स्पर्धा पाहता २०१४ च्या निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघात रिंगणात होते, त्यापेक्षाही जास्त उमेदवार यावेळी रिंगणात राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, यावेळी ‘ मै हू ना’, अशी ग्वाही देत मतदारसंघात जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे हरीश पिंपळे यांनी हा मतदारसंघ राखत दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली. सर्वसामान्यांचा आमदार ही त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा या ‘टर्म’मध्येही कायम ठेवली असली तरी, यावेळी त्यांच्याविरोधात ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ असल्याचे चित्र विरोधक निर्माण करीत आहेत, तर अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांना भाजपामध्ये सन्मानाने प्रवेश देऊन पिंपळे यांच्यासाठी पक्षानेच अंतर्गत स्पर्धक निर्माण केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा करून भाजपासमोर डोकेदुखी वाढविली आहे. आघाडीमध्ये राष्टÑवादीच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसलाही ‘बदलाचे’ घुमारे फुटले असल्याने युती व आघाडीच्या घटक पक्षांमध्येच चुरस निर्माण झाली आहे.
शिवसेना सक्रिय
शिवसेनेचे गतवेळचे उमेदवार महादेवराव गवळे यांनी या मतदारसंघातील सक्रियता कायम ठेवत आपली दावेदारी प्रबळ केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा, यासाठी त्यांनी ‘मातोश्री’ला साकडे घातले आहे.
शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपातून सेनेत गेलेले प्राचार्य प्रभू चापके यांनाही उमेदवारीची आशा असून, तेही सक्रिय झाले आहेत.
काँग्रेस, राष्टÑवादीत गर्दी
आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याला आला आहे. २०१४ मध्ये येथे राष्टÑवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले होते. त्यावेळी काँग्रेसचे श्रावण इंगळे यांनी चौथ्या क्रमांकाची मते घेतली तर राष्टÑवादीचे डॉ. सुधीर विल्हेकर हे पाचव्या क्रमांकावर होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनाही महत्त्वाकांक्षेचे घुमारे फुटले असून, हा मतदारसंघ काँग्रेसचा मिळावा, यासाठी श्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे झाल्यास प्रसंगी उमेदवार आयात करण्याचीही तयारी स्थानिक नेतृत्वाची आहे. दुसरीकडे राष्टÑवादीमधून इच्छुकांची मोठी यादी आहे. गतवेळचे उमेदवार डॉ. विल्हेकर यांच्यासह रवी राठी, अतुल इंगळे, कोमल तायडे व श्रावण रणबावळे यांची नावे चर्चेत आहेत.
‘वंचित’मध्येही स्पर्धा रंगणार!
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या भारिप-बमसंने २६.४० टक्के मते मिळवित दुसरा क्रमांक कायम ठेवला. येथे शिवसेना तिसºया तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. ही आकडेवारी पाहता वंचित बहुजन आघाडीचा मोठा जनाधार या मतदारसंघात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीचा लाभ मिळविण्यासाठी ‘वंचित’मध्येही उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा रंगणार आहे. या पक्षाच्यावतीने राहुल डोंगरे, सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, संदीप सरनाईक व संजय नाईक यांच्या नावाची चर्चा आहे.

शिवसेनेच्या युवा नेत्याने मागितली काँग्रेसकडे उमेदवारी!

मूर्तिजापूरमधील एका शिवसेनेच्या युवा नेत्याने थेट काँगे्रसच्या मुख्यालयात बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती आहे; मात्र या वृत्ताला काँग्रेसकडून दुजोरा मिळाला नसला तरी मुर्तिजापूरात मात्र चर्चा आहे.
अमरावतीच्या राणा पॅटर्नची चर्चा
मूर्तिजापूर मतदारसंघात अमरावतीच्या रवी राणा पॅटर्नची चर्चा जोरात आहे. अनेक उमेदवारांनी राणा यांच्या कार्यशैलीची माहिती घेत, पक्षाने यावेळी उमेदवारी नाही दिली तर या ‘पॅटर्न’नुसार अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यावरून उमेदवारीची स्पर्धा अधोरेखित होते.

 

Web Title: Competition for candidacy in all the parties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.