लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू/डोंगरगाव : स्थानिक पोलीस ठाणे हद्दीतील सिसा (उदेगाव) येथील ३0 वर्षीय युवकाचा मृतदेह शेतशिवारात विहिरीमध्ये आढळून आला. दरम्यान, हा युवक एक महिन्यापासून बेपत्ता होता. तशी तक्रार नातेवाइकांनी बोरगाव मंजू पोलिसात केली होती. अखेर १८ जूनच्या सकाळी त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर आलेला दिसून आला.
मूळचा जळगाव जामोद येथील रहिवासी असलेला सीताराम किसन नागपुरे (३0) हा सिसा (उदेगाव) येथील त्याच्या नातेवाइकांकडे वास्तव्यास होता. तो एक महिन्यापूर्वी कामाला जातो असे सांगून घरून निघून गेला होता. नातेवाइकांनी त्याचा बराच शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी तो हरविल्याची माहिती पोलिसात दिली होती. रविवारी सीतारामचा मृतदेह गावानजिकच्या शेतशिवारातील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी. के. काटकर, हेकॉ. महादेव पवार, विष्णू ढोरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.