अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:13 PM2019-06-12T12:13:22+5:302019-06-12T12:13:28+5:30

शिवसेना सदस्याने आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थायी समिती सभापती आणि या सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

 BJP-Shivsena corporators get verbal in Municipal Standing committee miting | अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली!

अमृत योजनेच्या मुद्यावर भाजप-सेना सदस्यांमध्ये जुंपली!

Next

अकोला: अमृत योजनेंतर्गत जुनी पाइपलाइन बदलवून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शिवसेना सदस्याने उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शिवसेना सदस्याने आक्रमक भूमिका घेतल्याने, स्थायी समिती सभापती आणि या सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
मंगळवारी मनपा स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या जुनी पाइपलाइन बदलवून नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याच्या मुद्यावर शिवसेना सदस्य गजानन चव्हाण यांनी आक्रमक होत, संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी उचलून धरली. चव्हाण यांनी पाइपलाइन बदलविण्याचे काम संथ गतीने होत असल्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी पुरवठा बंद आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने, त्यांनी स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांना जाब विचारला. त्यामुळे नगरसेवक चव्हाण आणि सभापती मापारी यांच्यातच जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना सदस्यांनी अमृत योजनेंतर्गत काम करणाºया कंत्राटदार व अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सभापती विनोद मापारी यांनी नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी यासाठी बैठक आयोजित करण्याचे सभेत सांगितल्यावर शिवसेनेचे सदस्य शांत झाले. भाजपचे अनिल गरड यांनीसुद्धा अमृत योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कंत्राटदार व संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु गरड व शिवसेनेचे चव्हाण यांनी कंत्राटदाराला दंड ठोठावून अधिकाºयांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. यासोबतच भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी घरकुलांचा प्रश्न निकाली काढण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगत, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. भाजप नगरसेवक हरीश काळे यांच्यासह इतर सदस्यांनी पथदिवे लावण्याचे काम संथ गतीने होत असून, कामाला गती देण्याची मागणी केली. करवसुलीलाही गती देण्याची मागणी सदस्यांनी केली. भाजपचे अनिल गरड यांनी आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात काय कारवाई केली, याविषयी अधिकाºयांना जाब विचारला. बडतर्फ सफाई कामगार लता रिल यांच्या अपील अर्जावर सभागृहात चर्चा करण्यात आली. सफाई कामगार लता रिल यांचा अर्ज सभागृहाने फेटाळून लावला.

नगरसेवक गरड यांचा जलप्रदाय विभागाला टाळे लावण्याचा इशारा
भाजपचे स्थायी समिती सदस्य अनिल गरड यांनी नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने, काही भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलप्रदाय विभागाने पाणी पुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास जलप्रदाय विभागाला टाळे लावण्याचा इशारा दिला. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानासुद्धा भाजपच्या नगरसेवकाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे. यावरून महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नऊ महिन्यांपासून देयकेच नाहीत!
भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी शहरातील सर्वच भागांत नागरिकांनी नळांना मीटर लावले; परंतु ढिसाळ कारभारामुळे गत नऊ महिन्यांपासून नागरिकांना पाण्याची देयकेच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत, नागरिकांना विनाकारण याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर जलप्रदाय विभागातील अधिकाºयांनी नागरिकांना अ‍ॅव्हरेज बिल देण्यात येईल, असे सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या अभिनंदनाचा ठराव
अकोल्याला प्रथमच खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. ही बाब अकोला शहरासाठी अभिमानास्पद असून, खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेविका अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर यांनी मांडला.

 

Web Title:  BJP-Shivsena corporators get verbal in Municipal Standing committee miting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.