प्रकाश आंबेडकरांमुळे संपली ओवेसींची राजकीय अस्पृश्यता; मिटली कटुता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:24 PM2019-04-13T12:24:20+5:302019-04-13T17:06:37+5:30

सध्यातरी आंबेडकरांमुळे ओवेसींची राजकीय अस्पृशता संपली असून, मुस्लिमेतर समाजापर्यंत त्यांना विचार पोहोचविण्याची संधी मिळाल्याचे चित्र आहे.

Asaduddin owaisi's political untouchability come to an end due to Ambedkar | प्रकाश आंबेडकरांमुळे संपली ओवेसींची राजकीय अस्पृश्यता; मिटली कटुता

प्रकाश आंबेडकरांमुळे संपली ओवेसींची राजकीय अस्पृश्यता; मिटली कटुता

Next

- राजेश शेगोकार

अकोला: सोशल इंजिनिअरिंगचा‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्येक निवडणुकीत नवा राजकीय डाव मांडला. या लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत मैत्रीचा अध्याय सुरू केला. या मैत्रीमुळे आंबेडकरांपासून बहुजन समाजातील काही घटक दुरावतील व त्यांना तोटा होईल, अशी अटकळ आहे. ही अटकळ किती खरी ठरेल, हे निकालाचे आकडे सांगतील; मात्र सध्यातरी आंबेडकरांमुळे ओवेसींची राजकीय अस्पृशता संपली असून, मुस्लिमेतर समाजापर्यंत त्यांना विचार पोहोचविण्याची संधी मिळाल्याचे चित्र आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित मतांचा विस्तार करीत ओबीसीच्या लहान-लहान घटकांना एकत्र आणले. या घटकांमध्ये दलित मतांचा टक्का हा सर्वात मोठा आहे. त्याला मुस्लीम मतांची जोड देण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेतले. या मैत्रीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतपेढीवरच आघात होणार असल्याने या दोन्ही पक्षांनी आंबेडकरांसोबतच्या आघाडीवर प्रश्न उपस्थित केला व अपेक्षेप्रमाणे अशी आघाडी प्रत्यक्षात आली नाही आणि महाराष्ट्रात वंचितच्या रूपाने तिसरा पर्याय रिंगणात आला. मुळातच अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमची सारी भिस्त ही मुस्लीम मतांवर राहिली आहे. त्यामुळे ही संघटना कट्टर असल्याचाही आरोप अनेक वेळा झाला. या कट्टरतेमुळेच एमआयएमला सोबत घेण्याबाबत कोणत्याही धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाने उत्सुकता दाखविली नव्हती; मात्र वंचितसोबत हा पक्ष जुळल्यामुळे सध्या एमआयएमचा विचार मुस्लिमेतर समाजापर्यंत पोहोचविण्याची संधी ओवेसी यांना मिळाली आहे. कट्टर विचारांना संविधानाच्या कक्षेची जोड देत ओवेसी काँग्रेस व भाजपावर टीकेची झोड उठवितात व आपले विचार पटवून देतात, त्यामुळे राज्यभरात आंबेडकरांच्या सोबतीने होणाºया खा. ओवेसींच्या भाषणाचे लोकांना प्रचंड आकर्षण आहे. वंचित आघाडीमुळे ओवेसींना आपल्या विचारांचा विस्तार करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले असल्याने त्याचा फायदा ते पुरेपूर उठविताना दिसत आहेत. मुस्लिमेतर समाजातही त्यांच्याविषयी सुरू झालेली सकारात्मक चर्चा त्यांचे राजकीय अछुतपण संपविणारी असून, ते स्वीकारार्ह ठरत असल्याचे दिसत आहे.

अकोल्यात टाळली सभा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत खा. ओवेसी हे राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडवित असले तरी आंबेडकरांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात ते प्रचाराला आले नाहीत. १० एप्रिल रोजी त्यांची प्रस्तावित सभा रद्द करण्यात आली आहे. काँगे्रसने राज्यात केवळ अकोल्यातच मुस्लीम उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातच ओवेसींनी प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका मुस्लीम समाजात असल्यामुळेच ओवेसींनी अकोल्याची सभा टाळल्याची चर्चा आहे. इतर समाजापर्यंत पोहोचताना आपल्या हक्काची मते निसटून जाऊ नये, हा ओवेसींचा प्रयत्न असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Web Title: Asaduddin owaisi's political untouchability come to an end due to Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.