युती जुळली ‘मती’ जुळेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:58 PM2019-02-24T13:58:12+5:302019-02-24T14:01:36+5:30

अकोला: भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघांतील राजकीय समीकरणांचीही चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.

alliance 'matching' ; What about wisdom? | युती जुळली ‘मती’ जुळेल काय?

युती जुळली ‘मती’ जुळेल काय?

Next

अकोला: भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघांतील राजकीय समीकरणांचीही चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. युती होणार की तुटणार, या संभ्रमात तब्बल साडेचार वर्षे दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली. अनेक पहिलवानांना तेल लावले अन् ऐन मैदानात उतरविण्याआधीच त्यांना रिंगणाबाहेर फक्त टाळ्या वाजविण्याचे काम ठेवल्याने मतांसाठी ‘मती’ जुळविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे. लोकसभेसोबतच विधानसभांचेही जागा वाटप ठरल्यामुळे या दोन्ही पक्षांतील अर्ध्याहून अधिक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या स्वबळाच्या तयारीतील बळच युतीच्या घोषणेने हरवून घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
अकोला, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघांत खासदार संजय धोत्रे, खासदार प्रतापराव जाधव व खासदार भावना गवळी हे तीनही विद्यमान खासदार युतीचे उमेदवार असतील, हे सध्यातरी निश्चितच आहे. या तिघांच्या विरोधात
एन्टी इन्कम्बन्सी असली तरी प्रबळ विरोधकांचा अभाव अन् विरोधकांमधील गटबाजी हा समान दुवा तिन्ही मतदारसंघांत आहे. अकोल्यात खा. संजय धोत्रे यांच्या रणनीतीपेक्षाही विरोधक काय करतात, यावरच या मतदारसंघाची भविष्य ठरणार आहे. धोत्रे यांच्याविरोधात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा गट असला तरी त्यांनी विरोधकांसह पक्षांतर्गत गटालाही नामोहरम केले आहे. यावेळी धोत्रे यांना विश्रांती देऊन डॉ.पाटील यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरविण्याचीही चर्चा भाजपाच्या वर्तुळात होती; मात्र युतीच्या घोषणेनंतर ही चर्चा आता थांबलेली दिसत आहे. युतीसाठी भाजपाने शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढल्या, त्या पाहता उमेदवार बदलविण्याची जोखीम भाजपा पत्करणार नाही, अशीच स्थिती आहे. येथे भारिप-बमसं व काँग्रेस यांची आघाडी झाली, तरच भाजपासमोर तगडे आव्हान उभे ठाके ल; मात्र गेल्या काही दिवसांमधील राजकारणाचे चित्र पाहता, अशी आघाडीची शक्यता मावळली असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच तिरंगी लढत अपेक्षित असून, काँग्रेसचा उमेदवार कोण, यावरच लढतीची चुरस ठरणार आहे. युतीमुळे तसेही धोत्रे यांना बळ मिळाले असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी शिवसेना सर्वार्थाने कितपत साथ देते, यावरही या बळाचे महत्त्व ठरणार आहे. अकोला- वाशिम-यवतमाळमध्ये सलग तिसºयांदा विजय प्राप्त केलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या सध्या पक्षांतर्गत गटबाजीने हैराण आहेत. युती झाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात येथे फारसे चिंतेचे वातावरण नाही; मात्र भाजपातच अस्वस्थता आहे. भाजपाच्यावतीने जवळपास चार ते पाच नावे चर्चेत होती. सेनेच्या विरोधात थेट भाजपानेच शेतकरी मोर्चा काढून आपली तयारीही या मतदारसंघात अधोरेखित केली होती. त्यामुळे युती झाली तरी ‘मती’ एक होईल का, हा प्रश्नच आहे. शिवाय, सेनेतील भावना गवळी-संजय राठोड या दोन गटांतील संघर्ष ‘मातोश्री’वर मिटला असला तरी तो कार्यकर्त्यांपर्यंत कितपत झिरपतो, यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत. येथे काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांचे एकमेव नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठविले असून, ठाकरे-शिवाजीराव मोघे यांच्यातही ‘डिनर डिप्लोमसी’ झाल्याने काँग्रेस जिंकण्यासाठीच लढण्याची तयारी करीत आहे. फक्त काँग्रेस अंतर्गत गटबाजी थांबविता आली पाहिजे. बुलडाण्याची जागा शिवसेनेकडे आहे.
खासदार प्रतापराव जाधव यांनी घाटाखाली व घाटावर अशा दोन्ही विभागांत आपले वर्चस्व कायम राहील, याचा पुरेपूर प्रयत्न केला असला, तरी सेनेत दोन गट पडल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. या गटांना ‘शिवबंधनात’ एकत्र बांधण्याचे काम सर्वांत आधी करावे लागणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात खा. जाधव यांनी भाजपासोबत टोकाचे मतभेद होणार नाही, याची दक्षता घेत सेना वाढविण्याचे काम केले; मात्र २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपानेही आपली पाळेमुळे घट्ट केल्यामुळे आता भाजपाही लोकसभा मतदारसंघाचा दावेदार झाला आहे. भाजपा, सेनेचे संबंध नेहमीच एकमेकांना पूरक राहिले आहेत. येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांचे नाव लोकसभेसाठी अग्रक्रमाने होते. काँग्रेस, राष्टÑवादी व्हाया भाजपात पोहोचलेल्या धृपदरावांसाठी लोकसभा हा एक सक्षम पर्याय होता. कारण त्यांचा डोळा असलेल्या चिखली व बुलडाणा या दोन्ही मतदारसंघांत आधीच दावेदारांची संख्या प्रबळ आहे. आता युती झाल्याने धृपदरावांना राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवत सेनेच्या धनुष्याला खांद्यांवर घ्यावे लागणार आहे. आघाडीच्यावतीने राष्टÑवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जवळपास निश्चितच आहे. येथे स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांचाही आघाडीच्या कोट्यातून दावा आहे. त्यामुळे महाआघाडीचे त्रांगडे सुटल्यावरच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानीच्या काँग्रेससोबतच्या आघाडीचेही बारा वाजले तर सेना, स्वाभिमानी, राष्टÑवादी व भारिप-बमसं अशी चौरंगी लढतही या मतदारसंघात अपेक्षित असून, ही लढत अतिशय काट्याची ठरण्याची शक्यता आहे.

 

Web Title: alliance 'matching' ; What about wisdom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.