युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:55 AM2019-07-23T03:55:51+5:302019-07-23T03:56:15+5:30

अकोला जिल्ह्यातील चित्र : युतीत शिवसेनेला अन् आघाडीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

Alliance enthusiasm; Leader on the role of the deprived! | युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

Next

राजेश शेगोकार 

अकोला : अकोल्याच्या पाच पैकी चार मतदारसंघात विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणूकीत नवा विक्रम प्रस्थापित केला. केवळ बाळापूर मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाला विजय मिळाला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाने ‘शतप्रतिशत भाजप’ हे आव्हान घेऊन केलेल्या मोर्चेबांधणीमध्ये आता शिवसेनेचा दोन तर शिवसंग्रामचा एका मतदारसंघावरचा दावा अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे रंगले आहेत तर वंचित बहुजन आघाडी यावेळी नव्या दमाने रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ ने काँग्रेस आघाडीच्या विजयाचे गणित बिघडविल्यामुळे राज्यभरात ‘वंचित’च्या ताकदीची दखल घेत, नव्याने समीकरणांची मांडणी केली जात असली तरी अकोल्यात मात्र हे आव्हान नवे नाही. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात त्यांनी भारिप-बमसंच्या माध्यमातून केवळ मतांच्या विभाजनाचीच भूमिका पार पाडली नाही, तर थेट आमदार निवडून आणण्यापर्यंत तिसरा पर्याय दिला आहे.

शिवसेनेने दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. भाजपाचा आमदार नसलेला बाळापूर हा मतदारसंघ सेनेला देणे भाजपाला सहज शक्य आहे; मात्र सेनेला दोन मतदारसंघ हवे आहेत. कोणत्याही विद्यमान आमदाराचे तिकीट कापून सेनेला मतदारसंघ देणे भाजपाला सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यातही गेल्यावेळी बाळापूर मतदारसंघ भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला देण्याचे ठरले होते; मात्र ऐनवेळी चक्र फिरले अन् भाजपाचाच ‘एबी’ फॉर्म दाखल झाला, त्यामुळे बाळापूरसाठी शिवसंग्रामही आग्रही आहे. या पृष्ठभूमीवर सेना व शिवसंग्राम यांची समजूत कशी काढली जाते, यावरच ‘युती’ साठी कोण माती खाणार, हे ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही तयारीला लागली आहे; मात्र या तयारीला नेतृत्वाचे बळ कितपत मिळते, यावरच सारे काही अवलंबून आहे. आतापर्यंत आघाडीत काँग्रेसला अकोट, अकोला पूर्व, बाळापूर हे तीन मतदारसंघ मिळत आले आहेत, यावेळी मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अकोला पश्चिमवरही दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही बाळापूर या मतदारसंघात काँग्रेसने सातत्याने दिलेल्या मुस्लीम उमेदवाराचा पराभव होत असल्याचा मुद्दा समोर करीत या मतदारसंघावर दावा केला आहे. या दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे आघाडीत जागा वाटपाचा गुुंता होण्याची चिन्हे आहेत. हा गुंता व्यवस्थित सुटला व उमेदवारीची भाकरी फिरविली तरच दोन्ही काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची संधी आहे. गेल्यावेळी भारिप-बमसं म्हणून रिंगणात असलेला पक्ष यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आव्हान देण्यास सज्ज आहे. युती, आघाडी व वंचित अशी तिरंगी लढत अपेक्षित असली तरी उद्या वंचित महाआघाडीमध्ये सहभागी झालीच तर युतीसमोरील आव्हान तगडे ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुन्हा जागा वाटप व उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरेल, एवढे निश्चित.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :
अकोला पश्चिम: गोवर्धन शर्मा (भाजप) । मते : ६६,९३४ फरक ३९,९५३.
सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : अकोला पूर्व : हरिदास भदे (भारिप-बमसं) - २,४४० (विजयी - रणधीर सावरकर, भाजप).
एकूण जागा : ०५ । सध्याचे बलाबल
भाजप - ०४ , भारिप-बमसं-१

Web Title: Alliance enthusiasm; Leader on the role of the deprived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.