अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:16 AM2018-01-22T02:16:25+5:302018-01-22T02:17:07+5:30

अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

Akot: Researchers of Melghat made land survey | अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

Next
ठळक मुद्दे२६ गावांत ई-क्लासची २८0 हेक्टर जमीन उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.
मेळघाटमधून केलपाणी, गुल्लरघाट, नागरतास, बारुखेडा, सोमठाणा बु., सोमठाणा खु., अमोना, धारगड या आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, वातावरण मानवत नाही, शेत जमिनी नाही. त्यामुळे हे गावकरी पुन्हा जुन्या गावी जात आहेत. जमिनी मिळाल्याशिवाय जंगलाबाहेर निघणार नसल्याची भूमिका पुनर्वसित गावकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुनर्वसित गावकर्‍यांना जमिनी देण्याचा आदेश काढला आहे. तो आदेश घेऊन अकोला, अमरावतीचे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मेळघाटात जाऊन पुनर्वसित गावकर्‍यांशी चर्चा केली. परंतु, आधी ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतरच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे शासनाच्यावतीने त्यांना ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार विश्‍वनाथ घुगे व इतर अधिकारी, तलाठी, पटवार्‍यांसह पुनर्वसित गावकर्‍यांनी दहीखेल फुटकर या परिसरात उपलब्ध असलेल्या ई-क्लासच्या जमिनीची पाहणी केली आहे. तालुक्यातील २६ गावात ई-क्लासच्या जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनीचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालयाचे सहा पथक नियुक्त केले आहेत. तालुक्यात दहीखेल फुटकर, दिवठाणा, रामटेक, केळीवेळी, धामणगाव, रामापूर, धारुर, बोचरा, रुधाडी, हनवाडी, खासबाग, राहणापूर, कुटासा, करतवाडी, कावसा, मरोडा,  तांदूळवाडी, चोरवड खु., खैरखेड बु., हिलालाबाद, शहापूर, नांदखेड,  कवठा खु., लामकाणी, खिरकुंड खुर्द, बळेगाव आदी गावांत २८0 हेक्टर ई-क्लासची जमिन उपलब्ध आहे. ही जमीन पुनर्वसित गावकर्‍यांना दाखविल्यानंतर ती पेरणीयोग्य आहे किंवा काय आदी बाबतचा आढावा घेऊन पुनर्वसित गावकरी सामूहिक निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, मेळघाटमध्ये ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित गावकरी व वन विभागामध्ये संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशा स्थितीत  शासन पुनर्वसित गावकर्‍यांच्या समस्या कधी व कशाप्रकारे निकाली काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Akot: Researchers of Melghat made land survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.