अकोट : खारपाणपट्टय़ात गारपिटीचा शेतीसह घरांना तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:23 AM2018-02-12T02:23:14+5:302018-02-12T02:23:24+5:30

अकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत.

Akot: Kill the house with hailstorm farm in Kharpani belt! | अकोट : खारपाणपट्टय़ात गारपिटीचा शेतीसह घरांना तडाखा!

अकोट : खारपाणपट्टय़ात गारपिटीचा शेतीसह घरांना तडाखा!

googlenewsNext
ठळक मुद्देअकोटात  महिला जखमी, एका मेंढराचा मृत्यू ,दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत. गहू, तुरीसह  इतर पिकांना फटका बसला असला, तरी हरभर्‍याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे ५६४ हेक्टर शेती व २७५ घरांचे किरकोळ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनामा करण्याचा आदेश तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी दिला. 
अकोट तालुक्यात इतरत्र तुरळक पाऊस पडला. शेत व रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. यामध्ये खापरवाडी येथील संतोष अवारे यांचे शेतात बाहेरगावाहून मेंढरं घेऊन आलेल्या डोबाळे यांच्या मालकीच्या एका मेंढराचा मृत्यू झाला, तर दोन मेंढरं जखमी झाले आहेत. तसेच  जनाबाई डिगा डोबाळे ही महिला गारपिटीने जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. खारपाणपट्ट्यातील २४ गावांत जोरदार गारपीट झाली. रौंदळा, देवरी, पिंप्री डिक्कर, आसेगाव बाजार, कवठा खु., जऊळका, खापरवाडी बु., सावरा, देऊळगाव, मिर्झापूर, वरुर, कालवाडी, धनगरवाडी, हिलालाबाद, आलेवाडी, बळेगाव, कवठा बु., सावरखेड (उजाड), सावरगाव, खापरवाडी खु., रंभापूर, मंचनपूर, ढगा, विटाळी, करतवाडी या गावात सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान पाऊस व गारपीट झाली. 
यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार अकोट मंडळात ८0 हेक्टर, मुंडगाव मंडळात १३९ हेक्टर, तर आसेगाव बाजार मंडळात ३४५ हेक्टर शेतीचे नुकसान, तर आसेगाव बाजार मंडळात अंदाजे २७५ कवेलू व इतर किरकोळ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांना दिला आहे. या अहवालावरून नुकसानाचा पंचनामा करण्याबाबत गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. तीन कर्मचारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पंचनाम्याचा सविस्तर अहवाल १३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
दरम्यान, नुकसान झालेल्या आसेगाव बाजार, वरुर, सावरगाव या परिसरातील शेतांच्या नुकसानाची पाहणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार विश्‍वनाथ घुगे व तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे यांच्यासह राजू नागमते, भाजप तालुका अध्यक्ष राजेश रावणकार, संदीप उगले, शेतकरी उपस्थित होते.

गारपीटग्रस्तांचा तातडीने  सर्व्हे करा - भारसाकळे
तेल्हारा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अकोट मतदारसंघातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे विनाविलंब महसूल आणि कृषी विभागाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दिले आहेत. अकोट मतदारसंघात तूर, कपाशी, गहू, हरभरा व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानीचा सर्व्हे तातडीने करून दिलासा देण्याचे निर्देश आमदार भारसाकळे यांनी अकोट आणि तेल्हारा तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. 

दानापूर परिसरात अधिकार्‍यांची भेट 
दानापूर : तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या दानापूर, वारखेड, सौंदळा परिसरात उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व तलाठी यांनी भेट दिली. प्रथमदर्शनी या भागात १९३४ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दानापुरात लिंबा एवढी गार पडल्याने गहु, हरभरा, टोमॅटो, कोबी, वांगे आदींसह इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. 

पातूर तालुक्यात तहसीलदारांनी केली पाहणी
पातूर : तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची प्राथमिक पाहणी पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे, बाभूळगावचे तलाठी डी.के. देशमुख, सस्तीचे तलाठी उखळकर, हिंगण्याचे तलाठी धारसकर, चतारीचे तलाठी पवार यांनी प्राथमिक पाहणी केली. तालुक्यातील बाभूळगाव, तांदळी, माळराजुरा, धोदाणी, कोसगाव या भागात गारपीट झाली. 


दिग्रस परिसराला दिली रात्री भेट 
दिग्रस बु : परिसरातील सस्ती, दिग्रस बु., दिग्रस खु, हिंगणा परिसरात हरभर्‍याच्या आकाराएवढी गार पडली. त्यामुळे,  शेतकर्‍यांचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार डॉ. पुरी व तालुका कृषी अधिकारी मकासरे, तलाठी डी. के. देशमुख यांनी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान भेट दिली. यावेळी सस्ती येथील तलाठी उखळकर, सरपंच वाडेकर, पोलीस पाटील अरुण बदरखे, शेतकरी अंकुश निखाडे, धनंजय देशमुख, कृष्णा मालठाणे, सुनील शेळके, तर दिग्रस बु. येथील ज्येष्ठ शेतकरी रामभाऊ बराटे, गजानन ताले, गणेश ताले, विठ्ठल ताले, गजानन गवई, गणेश धोत्रे, सुधाकर कराळे, कोतवाल गजानन वैराळे, गोपीनाथ ताले, बाळू धोत्रे, देवराव गवई, राजू पारस्कर, दिग्रस खु.च्या सरपंच मंगला इंगळे आदींनी सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Akot: Kill the house with hailstorm farm in Kharpani belt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :akotअकोट