दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर : नेत्र बुबुळांच्या संकलनात अकोला अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:21 PM2018-06-10T14:21:18+5:302018-06-10T14:21:18+5:30

अकोला: गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे.

Akolekar: Akola Forerunner in the eye donation | दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर : नेत्र बुबुळांच्या संकलनात अकोला अग्रस्थानी

दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर : नेत्र बुबुळांच्या संकलनात अकोला अग्रस्थानी

Next
ठळक मुद्देगत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. जालना येथील गणपती नेत्रालयाला सर्वाधिक नेत्र बुबुळ संकलित करून देणारे अकोला शहराने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले. २0१६-१७ मध्ये २ हजार २४९ नेत्र बुबुळ संकलित झाले आणि गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.

- नितीन गव्हाळे

 अकोला: हळूहळू का होईना, नेत्रदानाचे महत्त्व जनमानसाला कळू लागले. नेत्रदान चळवळीला गती मिळू लागली. अकोलेकर धार्मिक कार्यातील योगदानासाठी जसे परिचित आहेत. तसे आता नेत्रदान चळवळीतील योगदानासाठी अकोलेकरांची ओळख बनत आहे. गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे.
एकेकाळी नेत्रदान करण्याबाबत अनेक गैरसमज होते. अंधश्रद्धेचा पगडा होता; परंतु अकोल्यात १८८४ मध्ये डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी नेत्रदानाची चळवळ हाती घेतली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. निधन झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी गेल्यावर, त्या कुटुंबातील व्यक्ती अपमानित करायच्या, हाकलून द्यायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. अकोल्यात डॉ. पनपालिया यांनी अकोला नेत्रदान संस्थेच्या माध्यमातून नेत्रतज्ज्ञ डॉ. जुगल चिराणिया यांनी रोटरी क्लबच्या आणि शहरातील काही सामाजिक संस्थांनी नेत्रदानाविषयी मोठी जनजागृती केली. त्याचेच फलस्वरूप जालना येथील गणपती नेत्रालयाला सर्वाधिक नेत्र बुबुळ संकलित करून देणारे अकोला शहराने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले. डॉ. पनपालिया, श्याम पनपालिया आणि रोटरी क्लबचे डॉ. जुगल चिराणिया यांच्या माध्यमातून दर महिन्याला १५ ते २0 जणांचे नेत्रदान करण्यात येते. अकोल्यातून वर्षाकाठी २६३ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. काही वर्षांमध्ये अकोल्यातून जालना येथील गणपती नेत्रालयामध्ये अडीच हजारावर नेत्र बुबुळ पाठविण्यात आले. या नेत्र बुबुळांच्या माध्यमातून शेकडो दृष्टिबाधितांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश निर्माण झाला. नेत्रदानाविषयी होत असलेली व्यापक जनजागृती लक्षात घेता, सामाजिक, धार्मिक संस्था आणि रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिक नेत्रदान संकल्पपत्र भरून देताना दिसतात. त्याचाच परिणाम, अनेक कुटुंबीय मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढे येत आहेत. नेत्रकमलांजली हॉस्पिटल किंवा रोटरी क्लबचे डॉ. चिराणिया यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करीत आहेत. हा दृष्टिबाधितांसाठी एक आशेचा किरणच आहे, असेच म्हणता येईल.


राज्यातील नेत्र बुबुळ संकलनाचे प्रमाण घटले
राज्यात नेत्रदानाची मोठी जनजागृती होत असली, जाहिरातींवर मोठा खर्च होत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत नेत्र बुबुळ संकलनाच्या संख्येत घट झाली आहे. शासनाच्या अहवालानुसार २0१५-१६ मध्ये ३ हजार २३0 नेत्र बुबुळांचे प्रत्यारोपण करण्यात आले.  २0१६-१७ मध्ये २ हजार २४९ नेत्र बुबुळ संकलित झाले आणि गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.

१९८७ मध्ये झाले पहिले नेत्रदान
अकोल्यात १९८४ पासून नेत्रदान चळवळीचे काम सुरू झाले. सुरुवातीला कोणीही मरणोत्तर नेत्रदान करायला तयार होत नव्हते; परंतु नेत्रदानाविषयी समाजात हळूहळू जनजागृती व्हायला लागली. दृष्टिदानाविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागला. त्यामुळेच १९८७ मध्ये गीतादेवी तोष्णीवाल यांचे पहिले नेत्रदान अकोल्यात झाले. त्यानंतर शहराचे तत्कालिन नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर, तत्कालिन खासदार नानासाहेब वैराळे, स्वातंत्र्य सैनिक आढे आदी दिग्गजांचेही मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा
मृत्युपश्चात नेत्रदान केल्यास पुढील जन्मात अंधत्व येते, अशी अजब अंधश्रद्धा समाजात आहे. पुनर्जन्म होत नाही. मोक्ष मिळत नाही, अशीही अंधश्रद्धा समाजात आहे. त्यामुळे नेत्रदान पुरेशा प्रमाणात होत नाही, असे नेत्रदान चळवळीत गेली ३0 वर्षांपासून काम करणारे डॉ. चंद्रकांत पनपालिया सांगतात.

अकोल्यात नेत्रपेढीची परवानगी, अनुदान नाही
एकीकडे शासन नेत्रदान चळवळ रूजविण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु नेत्रदानाविषयी जनजागृती करणाऱ्या संस्थांना मात्र मदत करण्याबाबत शासनाचा आरोग्य विभाग उदासीन आहे. अकोल्यातील नेत्र बुबुळांचे संकलन पाहता, नेत्रपेढीची गरज आहे. अकोला नेत्रदान संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. नेत्रपेढीची शासनाकडे परवानगी मागितली. शासनाने परवानगी दिली; परंतु अनुदान दिले नाही आणि अनुदानाशिवाय नेत्रपेढी उभी राहू शकत नाही, त्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ तरी मिळणार कसे?

दृष्टिबाधितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अकोला शहर आहे. सर्वाधिक नेत्र बुबुळ पुरविण्यामध्ये अकोला राज्यात अग्रस्थानी आहे. अकोलेकरांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळेच नेत्रदान चळवळीला चालना मिळाली आहे.
डॉ. चंद्रकांत पनपालिया
अध्यक्ष, अकोला नेत्रदान संस्था.

 

Web Title: Akolekar: Akola Forerunner in the eye donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.