अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:43 AM2018-01-04T01:43:56+5:302018-01-04T02:19:49+5:30

अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी    भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध शांततेने करीत असताना, दुपारी शहरातील काही भागात संतप्त युवकांनी तुरळक दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या. भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 

Akolatan cracked off: stone pelting, breaks, and shouting! | अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

Next
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालये दुकाने बंदप्रवासी वाहतूक ठप्प, ऑटोही तुरळक पेट्रोल पंप बंद, कार्यालयांमध्ये शुकशुकाट 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध शांततेने करीत असताना, दुपारी शहरातील काही भागात संतप्त युवकांनी तुरळक दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या. भारिपच्या जिल्हा बंदच्या आवाहनामुळे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. 
कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवार सकाळपासून आंबेडकरी कार्यकर्ते गटागटाने रस्त्यावर उतरले. काही युवकांनी मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरातील जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, परिसरातील शेकडो युवकांनी मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकलवर फिरून युवक सुरू असलेले दुकाने बंद करताना दिसून येत होते. युवकांचे वेगवेगळे गट सिव्हिल लाइन चौकात गोळा होऊन मोठय़ा संख्येने मुख्य डाकघर चौकाजवळ आले. या ठिकाणी युवकांनी घोषणा दिल्या. त्यानंतर युवकांचा मोर्चा टॉवर चौकातून मार्गक्रमण करीत मोहम्मद अली चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील जयप्रकाश नारायण चौकात आला. त्यानंतर हे युवक अशोक वाटिका येथे आले. या ठिकाणी हजारो युवक, महिला व पुरुष गोळा झाले. हा जमलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी चौकात आल्यावर या ठिकाणी युवकांनी नारेबाजी केली. 

‘रिपाइं’ने काढला मोर्चा!
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आठवले गट शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
शहरातील वाशिम रोड बायपासस्थित पक्षाच्या कार्यालयापासून निघालेला मोर्चा हरिहरपेठ, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, कापड बाजार, गांधी रोड, बसस्थानक, अशोक वाटिका मार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. घटनेचा निषेध करीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. 
मोर्चात रिपाइं (ए) चे महानगराध्यक्ष गजानन कांबळे, रोहित वानखडे, युवराज भागवत, विद्यानंद क्षीरसागर, अजय इंगोले, विजय सावंत, मनोज गमे, बाबूराव वानखडे, बाबाराव घुमरे, मनोज इंगळे, दीपक नवघरे, आकाश हिवराळे, स्वप्निल पालकर, अजय वानखडे, बाळू सरकटे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरात ठिकठिकाणी दगडफेक
शहरात शांततेत आंदोलन सुरू असताना, काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या. सिंधी कॅम्प, खदान परिसरासोबतच तुकाराम चौक, इन्कम टॅक्स चौकातील दुकानांवर आंदोलकांनी दगडफेक केली. तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्‍या राउंड रोडवरील आंदोलकांनी राउंड रोडवर हॉटेल व काही इमारतींवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच गोरक्षण रोडवरील एका वाइन बारवर आंदोलकांनी दगडफेक करून काचा फोडल्या.  तर राउंड रोडवरील अँड. रवींद्र कोकाटे, अँड. किरण खोत, बिसेन आणि धस बिल्डर यांच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याच परिसरातील एका मुलाला दगड लागल्याने तो जखमी झाला. 

वाहनांच्या काचा फोडल्या
तुकाराम चौक, खदान, मलकापूर रोड, राउंड रोड परिसरात संतप्त आंदोलकांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. संतप्त आंदोलकांनी एमएच ३0 एटी 0५६२, एमएच 0२ एम ११८९ या क्रमांकाच्या वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच बंद असलेल्या हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची तोडफोड केली. आंदोलकांनी राउंड रोडवरील विद्युत खांब पाडला तर खदान परिसरातील एटीएम फोडले.  

जुने बसस्थानकाजवळ वाद
आंबेडकरी आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी टॉवर चौकाकडून मोहम्मद अली रोडकडे जात असताना, काही आंदोलकांनी परिसरातील सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितले; परंतु काही दुकानदारांनी नकार दिल्यामुळे आंदोलकांनी त्यांच्यासोबत वाद घातला. प्रकरण चिघळणार असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे वाद निवळला. शहरातील शाळा, महाविद्यालये बंद 
महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी रात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सकाळपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होते. पालकांच्या सोयीसाठी शाळा, महाविद्यालयांसमोर बंदचे फलक लावण्यात आले होते. 

पोलीस अधीक्षकांसोबत वाद
मलकापूर, तुकाराम चौकात दगडफेक व वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली आणि आंदोलकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस अधीक्षक कलासागर यांनी त्यांची समजूत घातली. 

एसटीची चाके थांबली!
अकोला आगारासह मंगरुळपीर, वाशिम, अमरावती, पांढरकवडा, कारंजा आणि वाशिम डेपोच्या ६0 च्यावर गाड्या अकोल्यातच थांबविण्यात आल्यात. अकोला डेपोच्या गाड्यादेखील इतरत्र रखडल्या होत्या. अकोल्यात अडकलेल्या गाड्यात ५ शिवशाहींचाही समावेश आहे. यातील दोन औरंगाबादकडे धावणार्‍या तर एक नागपूर आणि दोन अमरावतीच्या आहेत. एका दिवसात अकोला आगारचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. राज्यभरात एसटी बंद झाल्याने आणि राज्यातील वातावरण चिघडल्याने खासगी लक्झरी चालकांनीही या बंदला पाठिंबा दिला.

चालक-वाहकांसह प्रवाशांचीही केली जेवणाची सोय
अकोला डेपोबाहेरील एसटीचालक आणि वाहक बुधवारी अकोल्यात अडकले.  बंदमुळे चालक-वाहकांच्या जेवणाचीही सोय नव्हती. दरम्यान, अकोला आगार क्रमांक दोनचे व्यवस्थापक अरविंद पिसोडे यांच्या नेतृत्वात राजू गोगे, अशोक सागळे, साकरकर, देवराव इंगळे, महादेव जंजाळ यांनी पुढाकार घेऊन गोगे यांनी दीडशे लोकांना पुरेल एवढय़ा पोळ्य़ा आणि बेसन-भात  घरून आणून उपाशी लोकांना जेऊ घातले. यामध्ये बसस्थानकावरील गरीब प्रवाशांनाही सहभागी करून घेतले गेले.

ग्रामीण भागात कडकडीत बंद
- जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर आणि बाश्रीटाकळी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले असून, कडकडीत बंद पाळण्यात आला. 
- अकोला तालुक्यातील हिंगणी येथे खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच बाळापूर येथे उभी असलेली बस जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांनी केला. 
- वाहक, चालकांनी वेळीच बस विझवल्याने पुढील अनर्थ टळला. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
 

Web Title: Akolatan cracked off: stone pelting, breaks, and shouting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.