अकोला : खुल्या बाजारातील भावापेक्षा ‘रेशन’ची तूर डाळ महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:37 AM2018-01-16T01:37:26+5:302018-01-16T01:39:13+5:30

अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये  किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले असून, खुल्या बाजारात तीन नंबर दर्जाची तूर डाळ ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने विकली जात असताना, त्याच दर्जाची तूर डाळ रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत आहे.

Akola: 'Ration' tur dal is expensive than open market. | अकोला : खुल्या बाजारातील भावापेक्षा ‘रेशन’ची तूर डाळ महाग!

अकोला : खुल्या बाजारातील भावापेक्षा ‘रेशन’ची तूर डाळ महाग!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप

संतोष येलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये  किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले असून, खुल्या बाजारात तीन नंबर दर्जाची तूर डाळ ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने विकली जात असताना, त्याच दर्जाची तूर डाळ रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानांमधून (रेशन ) शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ खुल्या बाजारात असलेल्या  भावापेक्षा महाग असल्याची बाब समोर आली आहे.
बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना  सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना  तूर डाळ वाटप करण्यासाठी ५00 क्विंटल तूर डाळीचा साठा प्राप्त झाला. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला असून, जिल्हा पुरवठा विभागामार्फत गत आठवड्यापासून रास्त भाव दुकानांमधून जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ५५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. बाजारात तीन नंबर दर्जाची तूर डाळ ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. 
याच तीन नंबर दर्जाची तूर डाळ रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार भावाच्या तुलनेत  रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ महाग असल्याची बाब समोर येत आहे.

शिधापत्रिकाधारकांची टाळाटाळ!
रास्त भाव दुकानांमध्ये ५५ रुपये प्रती किलो दराने मिळणारी तूर डाळ बाजारात ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने मिळत असल्याने, रास्तभाव दुकानांमधून मिळणारी तूर डाळ घेण्यास शिधापत्रिकाधारकांकडून टाळाटाळ केली जात आहे.

बाजार आणि ‘रेशन’च्या तूर डाळीचे दर !
बाजारात एक नंबर दर्जाची फटका तूर डाळ ७४ ते ७५ रुपये प्रती किलो व सव्वा नंबर दर्जाची तूर डाळ ६८ ते ७0 रुपये प्रती किलो आहे. रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रती किलो दराने  वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ तीन नंबर दर्जाची असून, याच दर्जाची तूर डाळ बाजारात ४५ ते ५0 रुपये किलो दराने आहे.

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना प्राप्त झालेली तूर डाळ तीन नंबर दर्जाची आहे. ५५ रुपये प्रती किलो दराने या डाळीचे शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे. परंतु, याच दर्जाची तूर डाळ बाजारात ४५ ते ५0 रुपये किलो दराने मिळत असल्याने, रास्त भाव दुकानातील ५५ रुपये किलो दराने तूर डाळ घेण्यास शिधापत्रिकाधारकांकडून टाळाटाळ केली जात आहे.
- शत्रुघ्न मुंडे
अध्यक्ष, जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना

Web Title: Akola: 'Ration' tur dal is expensive than open market.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.