In the Akola Panchayat Samiti filed a racket case against controversial branch engineer Raut | अकोला पंचायत समितीमधील वादग्रस्त शाखा अभियंता राऊतविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देकंत्राटदाराचे पाच हजार बळजबरी हिसकले!निलंबनाची वारंवार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त शाखा अभियंता किशोर राऊत याने कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंत्राटदाराकडून तब्बल ७५ हजार रुपये उकळल्यानंतरही अभियंता राऊत याने पैशाची मागणी सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शासकीय कंत्राटदार अक्षय कुळकर्णी यांना लोणाग्रा येथील रस्ता बांधकामाचा कंत्राट देण्यात आला होता, सदरचा कंत्राट सहा लाख रुपयांमध्ये दिल्यानंतर अक्षय कुळकर्णी यांनी या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर देयक अकोला पंचायत समितीमध्ये सादर केले. देयक काढण्यासाठी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याकडे अक्षय कुळकर्णी यांनी विनंती केली असता, राऊत याने पैशाची मागणी केली. देयकावर २५ टक्के द्यावेच लागणार असल्याचेही राऊत याने कुळकर्णी यांना सांगितले. त्यामुळे कुळकर्णी यांनी किशोर राऊतला ७५ हजार रुपये आधीच दिले होते, असे तक्रारीत नमूद आहे. मात्र, राऊत याने त्यानंतरही २५ हजार रुपयांची मागणी सुरूच ठेवली. मात्र, कुळकर्णी यांनी २५ हजार रुपये देण्यास नकार दिला. तहसील कार्यालयाजवळ राऊत व कुळकर्णी उभे असताना शाखा अभियंता राऊत याने कुळकर्णी यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकले. कुळकर्णी यांनी विरोध केला असता राऊतने देयक न काढण्याची धमकीही दिली. त्यामुळे पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याप्रकरणी कुळकर्णी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याविरुद्ध भांदवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाखा अभियंता राऊतला अटक करण्यात आलेली नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

निलंबनाची वारंवार कारवाई
शाखा अभियंता किशोर राऊत वादग्रस्त असल्याची माहिती आहे. त्याच्यावर तीन ते चार वेळा निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा वादग्रस्त शाखा अभियंत्याकडून लुटमार सुरू असताना प्रशासन याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

संपत्तीची चौकशी करा!
शाखा अभियंता किशोर राऊत याने प्रचंड माया गोळा केली असून, त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी कंत्राटदाराकडून करण्यात आली आहे. राऊतने नुकतेच गायगाव शेतशिवारात शेत घेतले असून, या शेतासह संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.