अकोला : भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:11 AM2018-04-24T02:11:29+5:302018-04-24T02:11:29+5:30

अकोला : महापालिकेच्या मालकीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी भूमी अभिलेख विभागाला नमुना ‘ड’ची मूळ प्रत सादर  करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असून, त्यासंदर्भात नगररचना विभागाने तयार केलेल्या फाइलला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ मंजुरी देणार आहेत.

Akola: Municipal movements to take possession of land | अकोला : भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

अकोला : भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

Next
ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिसांनी मागितली माहितीनगरसेविका पतीच्या अडचणी वाढणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या मालकीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी भूमी अभिलेख विभागाला नमुना ‘ड’ची मूळ प्रत सादर  करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असून, त्यासंदर्भात नगररचना विभागाने तयार केलेल्या फाइलला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ मंजुरी देणार आहेत. दुसरीकडे या प्रकरणी मनपाच्यावतीने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल असल्यामुळे पोलिसांनी प्रशासनाकडे माहिती मागितली असून, प्रशासनाच्या माहितीनंतर नगरसेविका पती शेख इब्राहिम यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत. 
महापालिकेच्या मालकीचा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेला नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ नुसार चार हजार चौरस फूट भूखंड प्रकाशझोतात आला आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे आहे. असे असले तरी सदर भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगररचना विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहीम यांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाची सर्रास विक्री झाल्याचे ‘लोकमत’ने समोर आणताच मनपा प्रशासन व भूमी अभिलेख विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणाचा ऊहापोह होताच सदर भूखंडाची फेरफार नोंद रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक योगेश कुळकर्णी यांनी शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावे असलेल्या भूखंडाच्या फेरफार नोंदीचे पुनर्विलोकन केले. त्यानंतर सदर भूखंडाच्या फेरफार नोंदीमध्ये असलेले शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावाची नोंद रद्द करून हा भूखंड महापालिकेच्या नावाने नोंदणी करण्यात आला आहे. फेरफार नोंदीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. मनपाचे नगररचनाकार विजय इखार यांनी फेरफार नोंद रद्द केल्यानंतर जमिनीचा नमुना ‘ड’ची मूळ प्रत मिळवण्यासाठी फाइल तयार केली असून अंतिम मंजुरीसाठी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे सादर केली आहे. 

सिटी कोतवाली पोलीस प्रतीक्षेत!
मनपाचा भूखंड हडप केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या विषयी सिटी कोतवाली पोलिसांनी मनपाकडे माहिती मागितली असून, त्यानंतर दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती आहे.

मनपाच्या मालकीची जागा हडप करण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी नगररचना विभागाच्या आवक-जावकमधील नोंदी तपासण्याची सूचना केली आहे. दोषींची हयगय केली जाणार नाही. 
-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा 

Web Title: Akola: Municipal movements to take possession of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.