भाजपाचा होणार महापौर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:13 AM2018-12-18T11:13:38+5:302018-12-18T11:14:02+5:30

महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानी येऊनही भाजपने महापौरपदासाठी जोरदार फिल्ंिडग लावली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक झाल्याची माहिती आहे.

Will the BJP make the mayor? | भाजपाचा होणार महापौर ?

भाजपाचा होणार महापौर ?

googlenewsNext

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानी येऊनही भाजपने महापौरपदासाठी जोरदार फिल्ंिडग लावली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक झाल्याची माहिती आहे. नव्या राजकीय समीकरणात शिवसेनेचे काही नगरसेवकही सहभागी असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान महापौरपदासाठी कोणताही घोडेबाजार होणार नसल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नवी राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी नगरसेवकांमध्ये खलबते सुरू झाली आहेत.
महापालिका निवडणुकीत ६८ पैकी सर्वाधिक २४ जागा मिळवून शिवसेना अव्वल राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर होईल, असा आतापर्यंत अंदाज बांधला जात होता. दुसºया स्थानी राष्ट्रवादी (१८), तर तिसºया स्थानी भाजप (१४) आहे. काँग्रेस (५), बसपा (४), अपक्ष (२)असे महापालिकेत संख्याबळ आहे. शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, अनिल शिंदे, योगिराज गाडे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र कोणत्याही एकाची महापौरपदाचा उमेदवार म्हणून अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे सेनेचे नगरसेवक संभ्रमात आहेत.
तिस-या स्थानी असले तरीही महापौरपद मिळविण्याच्या आशा भाजपने सोडलेल्या नाहीत. एकीकडे शिवसेनेचा उमेदवार घोषित झाला नाही, तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपशी युतीबाबत चर्चा करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. भाजपने मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी स्थानिक पातळीवर चर्चा केली आहे. रविवारी रात्री भाजप-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र होते.भाजपच्या एका मंत्र्याच्या आदेशानेच दोन्ही पक्षाचे नगरसेवक चाचपणी करण्यासाठी एकत्र आले होते. भाजपचा महापौर झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही विनाशर्त पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
आज गटनोंदणी
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष असे पाचही राजकीय पक्ष आपापल्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी सोमवारी रात्रीच नाशिक येथे रवाना झाले आहेत. मंगळवारी सर्वच पक्ष आपापल्या गटाची स्वतंत्रपणे नोंदणी करणार आहेत. त्यानंतर ते सहलीवर रवाना होणार आहेत. महापौर निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर झाला असून मंगळवारी महापौर निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

वाकळे की गंधे?
महापौरपदासाठी भाजपने फिल्ंिडग लावल्यानंतर भाजपमध्ये आता महापौरपदासाठी नावे चर्चेत आली आहेत. तिसºयांदा नगरसेवक झालेले बाबासाहेब वाकळे यांनीही फिल्ंिडग लावली आहे. वाकळे यांच्याकडे पदासाठी आवश्यक सर्व क्षमता असून त्यांच्यासाठी काही शिवसेनेचे नगरसेवकही मदत करण्याची शक्यता आहे. तसेच भैया गंधे यांच्या मातोश्री आधी नगरसेविका होत्या. पाच वर्षाच्या खंडानंतर गंधे यांनी महापालिकेत पुनरागमन केले आहे. तेही भाजपचे एकनिष्ठ आहेत. शिवाय गंधे यांचे संबंध थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची प्रदेश पातळीवरूनही घोषणा केली जाऊ शकते. खासदार गांधी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी दोघांचेही चांगले संबंध आहेत. मात्र आधी गटनोंदणी नंतर महापौरपदाचा उमेदवार ठरवू, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे.

भाजपची जबाबदारी डागवाले यांच्यावर
भाजपच्या १४ नगरसेवकांची गटनोंदणी करण्याची जबाबदारी खा. दिलीप गांधी यांनी माजी नगरसेवक तथा शहर भाजपचे उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्यावर सोपविली आहे. डागवाले हे भाजपच्या १४ नगरसेवकांना घेऊन नाशिकला रवाना झाले आहेत. ते १४ नगरसेवकांची गटनोंदणी करून घेणार आहेत. डागवाले हे फोडाफोडीच्या राजकारणात पटाईत आहेत.

घोडेबाजार टाळणार-राठोड
महापौरपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला तर महापौर होणाºयाला मोठे पैसे खर्च करावे लागतात. त्यातून अर्थकारण सुरू राहते. त्याचा विकास कामांना फटका बसतो. त्यामुळे शिवसेना कोणत्याही प्रकारे घोडेबाजार करणार नाही. महापौर हा शिवसेनेचाच होईल. मात्र पदाचा उमेदवार मातोश्रीवरूनच घोषित होईल. आधी गटनोंदणी होऊ द्या, नंतर रामदास कदम हे मातोश्रीवरून घोषणा करतील, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-बसपा किंगमेकर
काँग्रेसकडे पाच, तर बहुजन समाज पक्षाकडे चार नगरसेवक आहेत. भाजपशी चर्चा करताना राष्ट्रवादीने काँग्रेसला सोबत घेतलेले नाही. शिवाय काँग्रेस पाच जणांची स्वतंत्र गटनोंदणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पाच नगरसेवक नेमके कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता आहे. डॉ. सुजय विखे यांच्या आदेशाप्रमाणेच काम करू, अशी पाचही नगरसेवकांची भूमिका आहे. विखे यांना भाजपपेक्षा शिवसेना जवळची दिसते आहे. शिवाय बसपाचे चारजण ऐनवेळी कोणाच्या पारड्यात मतदान करणार, त्यावरच महापौरपदाची मदार आहे.

Web Title: Will the BJP make the mayor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.