शूरा आम्ही वंदिले! : आईसमोर घेतलेली शपथ निभावली, नारायण शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 03:19 PM2018-08-16T15:19:20+5:302018-08-16T15:39:15+5:30

काश्मीरसारख्या थंड प्रदेशात नारायण जाधव हे भारतमातेचे रक्षण करीत होते. प्रतिकूल हवामानात त्यांचे रक्त शत्रूला कंठस्नान घालण्यासाठी सळसळले.

We shouted! : Sworn oath taken by mother, Narayan Shinde | शूरा आम्ही वंदिले! : आईसमोर घेतलेली शपथ निभावली, नारायण शिंदे

शूरा आम्ही वंदिले! : आईसमोर घेतलेली शपथ निभावली, नारायण शिंदे

Next
ठळक मुद्देशिपाई नारायण अंबादास शिंदे युनिट -१४ मराठा कारगीलवीरगती २४ एप्रिल १९९९

काश्मीरसारख्या थंड प्रदेशात नारायण जाधव हे भारतमातेचे रक्षण करीत होते. प्रतिकूल हवामानात त्यांचे रक्त शत्रूला कंठस्नान घालण्यासाठी सळसळले. याच भागात सीमेवर पहारा देत असताना पाकिस्तानमधून अतिरेकी भारताच्या भूमित घुसले. त्यांना रोखण्यासाठी नारायण प्राणपणाने लढले. मात्र भारतीय जवानांना टिपण्यासाठी अतिरेक्यांनी रस्त्यावरच बॉम्ब पेरले होते. याच रस्त्यावर एका-एका अतिरेक्याला ठार मारण्यासाठी नारायण धावले. त्याचवेळी रस्त्यात पेरलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आणि नारायण भारतमातेसाठी शहीद झाले.
 मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळामुळे पवित्र झालेले अरणगाव. जगभरातील भाविक येथे समाधीस्थळी मौन पाळण्यासाठी येत असतात. याच गावाच्या शिवारात शिंदेवाडी म्हणून छोटीशी वाडी आहे. सर्वांचे आडनाव शिंदे म्हणून तिचे नाव शिंदेवाडी पडले. याच वाडीत अंबादास शिंदे शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. मात्र त्यांच्या जवान पुत्राने देशसेवेसाठी जे बलिदान दिले ते येथील मातीच्या सदैव चीरस्मरणात राहील.
नारायण यांचा जन्म नगरमध्ये झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. लहान नारायणही अगदी जन्मापासून धडाडीचे, शूर व पराक्रमी होते. शाळेत जाण्याचे वय नसताना शाळेत जाण्याची त्यांची धडपड सुरु होती. घरात सर्वांना त्यांचे कौतुक असायचे. वडील स्वत: त्यांना आपल्या खांद्यावर बसून शिंदेवाडी येथील जि. प. च्या प्राथमिक शाळेत घेऊन जात होते. पहिली ते चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण शिंदेवाडीच्या शाळेतच झाले. दरवर्षी त्यांच्या वर्गात पहिला नंबर ठरलेला असायचा. चौथीला तर नारायण यांना ८७ टक्के गुण मिळाले. ते अभ्यासात हुशार आहेत, हे पाहून घरी सर्वांना त्यांचा अभिमान वाटत होता. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण अरणगाव येथील मेहेरबाबा माध्यमिक विद्यालयात सुरु झाले.
शिक्षण सुरु असताना ते वडिलांना आपल्या शेतीकामात मदत करू लागले. नारायण यांना शेतीची खूप आवड होती. वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या काळ्या आईची सेवा करत. शेतीसोबत आपल्या संवगड्यांसोबत विटी दांडू खेळण्याची त्यांना जास्त आवड जडली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चांगले कपडे, वह्या-पुस्तके वेळेत मिळत नसत. घरात लाईटची सोय नसल्याने नारायण बाहेर रस्त्यावरील विजेच्या खांबाखाली जाऊन अभ्यास करत होते. हळूहळू वय वाढत होते. आता नारायण अभ्यासासोबत शेतीच्या कामात चांगले रमले होते. शेतीत राबायचे, गुरांना चारा पाणी द्यायचे. गाय-म्हशीच्या धारा काढणे अशी कामे आता ते करू लागले. एवढेच काय गावात दूध घालायला त्यांना जावे लागे. एवढे करूनही त्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळाले. ते शाळेत पाचवे आले. सर्वांना त्यांचे कौतुक वाटू लागले. सुट्टीमध्ये त्यांना व्यायाम करण्याची आवड जडली. ते नियमित व्यायाम करू लागले.
आता त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नगरच्या न्यू आटर््स कॉलेजमध्ये सुरु झाले. हळूहळू घरच्या आर्थिक स्थितीत थोडीशी सुधारणा होऊ लागली. त्यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण तेथेच पूर्ण केले. त्यांना देशसेवा करण्यासाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न पडू लागले. त्यादृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली. तयारी सुरु केली. व्यायाम सुरूच होता. मग एक दिवस ते औरंगाबाद येथे भरतीसाठी गेले आणि पहिल्याच प्रयत्नात भरती झाले. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले होते. भरती झाल्यानंतर त्यांचे पहिले ट्रेनिंग बेळगाव येथे सुरु झाले. सुमारे सहा महिने त्यांनी बेळगाव येथे आपले ट्रेनिंग पूर्ण केले. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर नारायण यांच्या आई-वडिलांना बेळगाव येथे कसम (शपथ) घेण्याच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलावले. मात्र वडिलांना शेतीत कामे असल्याने नारायण यांचे बंधू व आई त्यासाठी बेळगाव येथे गेले. आपल्या आईच्या साक्षीने त्यांनी देश रक्षणाची शपथ घेतली. यानंतर त्यांची खरी ड्यूटी सुरु होणार होती. आधी बबिना येथे काही दिवस काढल्यावर त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर येथील सुरंगकोट येथे २७ आर. आर. येथील युनिटमध्ये झाली. ते बबिना येथे असताना १४ मराठा बटालियन येथे कार्यरत होते. नंतर काश्मीर येथे त्यांचे युनिट बदलण्यात आले. ते २७ आर. आर मध्ये रुजू झाले. नारायण जगाच्या नैसर्गिक स्वर्ग समजले जाणारे काश्मीर येथे प्रतिकूल वातावरणात आपले कर्तव्य बजावत होते. हिवाळ््यातील थंडीतही ते भारत मातेची सेवा करीत होते. त्याचवेळी कारगीलमध्ये युध्दाची ठिणगी पडली होती. घुसखोर पाकिस्तानी अतिरेकी व सैनिकांनी आपल्या अखंडतेला आव्हान दिले होते. नारायण त्यावेळी घुसखोर अतिरेक्यांचा सामना करत होते. दोन्हीकडूनही गोळीबार सुरू होता. अतिरेकी आक्रमकपणे लढत होते. त्यांचा सामना करताना नारायण कुठेही डगमगले नाहीत. नारायण यांच्या शौर्यापुढे अतिरेक्यांचीही डाळ शिजली नाही. त्यामुळेच त्यांनी समोरासमोर लढण्याऐवजी भारतीय जवानांना टिपण्यासाठी रस्त्यावर बाँब पेरले. अतिरेक्यांशी लढतानाच रस्त्यातील बॉम्बचा स्फोट होऊन नारायण २४ एप्रिल १९९९ रोजी शहीद झाले. देशसेवा आणि देश रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. भारतमातेचा एक शूर वीर देशासाठी लढला.
त्यांच्या निधनाची बातमी एका सैनिकाने युनिटमध्ये कळवली. सैनिकाने त्यांचे शव आपल्या युनिटमध्ये आणले. युनिटमधून नगरच्या लष्करी कार्यालयात संपर्क करण्यात आला. नगर कार्यालयातील दोन सैनिक नारायण यांच्या घरी आले. त्यांनी नारायण देशसेवा करताना शहीद झाल्याची दु:खद बातमी त्यांच्या घरच्यांना कळवली. नारायण यांचे आई-वडील ही शोकवार्ता ऐकून मोठ्याने रडू लागले. आईने तर हंबरडा फोडला. आई-वडील यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांचे पार्थिव सुरुंगकोट येथून विमानाने आणण्यात आले. शव पुण्यातून घरी आणण्यात आले. आपला नारायण तिरंग्यात लपेटलेल्या पेटीत पाहून आई वडील आणि भावांना शोक अनावर झाला. मोठी गर्दी जमा झाली. शहीद नारायण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सारा गाव दु:खद अंत:करणाने जमा झाला. सर्वच गाव शोकसागरात बुडाले होते. लष्करी इतमामात शहीद नारायण शिंदे यांना अखेरची सलामी देण्यात आली. गावाची छाती गर्वाने भरून आली होती. आमच्या गावाचा एक जवान देश रक्षणाच्या कामी आला. नारायण तर गेले पण त्यांच्या युनिटमधील त्यांचे सहकारी नारायण यांच्या आईला भेटण्यासाठी आवर्जून येतात. त्यांना काहीतरी भेटवस्तू आणतात. आईच्या तब्येतीची विचारपूस करतात.
दरवर्षी साजरा होतो स्मृतिदिन
शहीद नारायण शिंदे यांचे सदैव स्मरण राहावे म्हणून त्यांचे गावातील ज्या शाळेत शिक्षण झाले तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे त्यांचा पुतळाही बसवण्यात आला आहे. दरवर्षी त्यांचा स्मृतिदिन साजरा करून त्यांच्या शौर्याला सलाम केला जातो.

- शब्दांकन : योगेश गुंड

Web Title: We shouted! : Sworn oath taken by mother, Narayan Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.