शूरा आम्ही वंदिले! : देश रक्षणासाठी दिले जिवाचे दान, भाऊसाहेब तळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:10 PM2018-08-18T16:10:53+5:302018-08-18T16:12:42+5:30

एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनीलहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले. दुसऱ्याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

We shouted! : Donated donations given for the protection of the country, Bhausaheb Talekar | शूरा आम्ही वंदिले! : देश रक्षणासाठी दिले जिवाचे दान, भाऊसाहेब तळेकर

शूरा आम्ही वंदिले! : देश रक्षणासाठी दिले जिवाचे दान, भाऊसाहेब तळेकर

googlenewsNext
ठळक मुद्देशिपाई भाऊसाहेब मारूती तळेकरजन्मतारीख १ जून १९७८सैन्यभरती १९ फेब्रुवारी १९९७वीरगती २ मार्च २०००वीरमाता सीताबाई मारूती तळेकर

एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनीलहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले. दुसऱ्याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मनात देशसेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपोआपच भाऊसाहेब यांची पावले सैन्यदलाकडे वळाली. भरतीसाठी बेळगाव गाठले. १९ फेब्रुवारी १९९७ रोजी सैन्यदलात भरती झाले. कारगील युद्धातील रक्षक आॅपरेशनमध्ये देशासाठी स्वत:ला वाहून घेतले़
न्याची भूमी असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमधील मारुती व सीताबाई तळेकर यांना चार मुली तर भाऊसाहेब हे एकुलते एक पुत्र. चार मुलींनंतर १ जून १९७८ रोजी तळेकर यांच्या घरात पुत्ररत्न झाले. वडिलांनी गावात रोजंदारी केली तर आई सीताबाई यांनी शेतावर मोलमजुरी करून मुलांना शिकविण्यासाठी कष्ट उपसले. भाऊसाहेब हे शाळेत हुशार पण आई वडिलांचे कष्ट पाहून सैन्य दलात भरतीसाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले. बेळगावला सैन्य दलाची भरती निघाली. भाऊसाहेब यांच्यासह मित्रमंडळी रेल्वेने बेळगावला गेले. १९ फेब्रुवारी १९९७ रोजी पहिल्याच प्रयत्नात भाऊसाहेब भरती झाले. बेळगावातच सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पहिली नियुक्ती काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील नौसेरामध्ये झाली.
राजौरी हा अतिशय थंड हवामान आणि जंगलाने वेढलेला परिसऱ या भागात अतिरेक्यांनी सहारा घेतला होता़ उंचच उंच टेकड्या आणि झाडांची गर्द दाटी यामुळे या अतिरेक्यांना शोधणे लष्करासमोर मोठे आव्हान होते़ हे आव्हान भाऊसाहेब यांनी पेलले आणि केला श्रीगणेशा भारतमातेच्या रक्षणाचा़
१९९९ मधील कारगील युद्ध थांबल्यानंतर पाकिस्तानचे अनेक सैनिक तसेच काही दहशतवाद्यांनी भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या टेकड्यांचा आश्रय घेतला होता़ त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्यदलाने रक्षक आॅपरेशन हाती घेतले होते. १ मार्च २००० साली रक्षक आॅपरेशनमध्ये भाऊसाहेब तळेकर हातात मशिनगन घेऊन अतिरेक्यांच्या दिशेने झेपावले होते़ पहाडी परिसरात सलग २४ तास अतिरेकी आणि भारतीय सैन्यामध्ये संघर्ष सुरु होता़ भाऊसाहेबांनी काही अतिरेक्यांना यमसदनी पाठविले होते. २ मार्च २००० रोजी पहाटेच्या वेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यामधील एक गोळी भाऊसाहेब यांच्या डोक्याला लागली आणि भाऊसाहेब युद्धभूमिवर कोसळले. कोळगावला भाऊसाहेब तळेकर शहीद झाल्याची वार्ता आली.
दोनच वर्षांपूर्वी गावातील सचिन साके हे जवान शहीद झाले होते. त्यामुळे कोळगाव परिसर पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला. भाऊसाहेब तळेकर एकुलते एक असल्याने घरी निरोप देण्याचे धाडस कोणीच केले नाही. तीन दिवसानंतर भाऊसाहेब यांचे शव लष्कराच्या वाहनातून घरी आले अन् एकच आक्रोश झाला. भाऊसाहेब यांचे आई, वडील, बहिणींनी हंबरडा फोडला. लष्करी इतमामात या कोळगावच्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

कोळगावात शहीद भवन
माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी कोळगावमधील वीर जवान सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांच्या पराक्रमाची कायम आठवण राहावी म्हणून शहीद भवन बांधण्यासाठी पुढाकार घेतला. याच पुढाकारातून कोळाईदेवी मंदिराच्या पायथ्याशी शहीद भवन उभे राहिले.

आधी लगीन बहिणीचे
भाऊसाहेब यांच्या लग्नासाठी घरच्यांनी विचार सुरू केला होता. विवाह निश्चित करण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण भाऊसाहेब यांनी अगोदर बहीण मीनाचे लग्न आणि नंतर माझे असे घरच्यांना सांगितले़ त्यामुळे भाऊसाहेबांच्या लग्नाचा विचार काही दिवस मागे पडला. त्यानंतर काहीच दिवसात आमचा पोटचा एकुलता एक गोळा गेला, अशी आठवण सांगताना वीरमाता सीताबाई यांना हृदयात दाटलेल्या भावना आवरता आल्या नाहीत.

निवारा उपलब्ध
भाऊसाहेब यांनी घर बांधण्याचे ठरविले होते. पण ते कामही अपूर्ण राहिले. भाऊसाहेब शहीद झाल्यानंतर कैलास जगताप यांनी तळेकर कुटुंबाला घरासाठी दोन गुंठे जागा दिली. त्या ठिकाणी तळेकर यांचे घर उभे राहिले. या घरात भाऊसाहेबांचे आई, वडील दोघेच वृद्धापणातील लढाई लढत आहेत.

शब्दांकन - बाळासाहेब काकडे /नानासाहेब जठार

Web Title: We shouted! : Donated donations given for the protection of the country, Bhausaheb Talekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.