केडगावमधील दगडफेक आम्ही केलीच नाही - अनिल राठोड यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:19 AM2018-05-06T10:19:29+5:302018-05-06T10:19:29+5:30

शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

We did not do stone pelting in Kedgaon - claim of Anil Rathod | केडगावमधील दगडफेक आम्ही केलीच नाही - अनिल राठोड यांचा दावा

केडगावमधील दगडफेक आम्ही केलीच नाही - अनिल राठोड यांचा दावा

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या लेखानंतर कार्यालयास भेट देऊन केली भूमिका स्पष्टसहायक अधीक्षक अक्षय शिंदे आणि कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्यामुळेच हत्याकांडफॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी उशिरा पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल ६०० शिवसैनिकांची पूर्ण नावे पोलिसांनी सांगावितमृतदेहांना पोलिसांनीच कोणाला हात लावू दिला नाहीकेडगावमध्ये अजूनही घबराट

अहमदनगर : शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला व केडगाव येथे झालेली दगडफेक याची तुलनाच होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
केडगाव दगडफेकीनंतर पोलिसांनी शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने शनिवारी ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळे राठोड यांनी शनिवारी स्वत:हून ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपली भूमिका विशद केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे उपस्थित होते. राठोड म्हणाले की, शिवसैनिक हे अटकेला भीत नाहीत. आम्ही केव्हाही अटक व्हायला तयार आहोत. मात्र पोलिसांनी राजकीय दबावापोटी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.
केडगावमध्ये शिवसैनिकांचे हत्याकांड झाले, त्यावेळी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात केडगावमधील दहशतीबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी आम्हाला केडगाव येथे शिवसैनिकांवर गोळीबार झाल्याचे समजले. आम्ही केडगावला जाण्यापूर्वीच मारेकरी तेथे दगडफेक करून पळाले होते. त्यानंतर हत्याकांड पाहून मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. त्यात शिवसैनिकांचा सहभाग नव्हता. पोलीस अधिकाºयांची जी वाहने अडविण्यात आली ती स्थानिक जनतेने पोलिसांविरोधात असलेल्या रोषातून अडविली. केडगावमध्ये निवडणुकीत प्रचंड दहशत असतानाही पोलिसांनी काहीच दखल घेतली नव्हती. त्या रागातून वाहने अडविली गेली. यातही शिवसैनिकांचा काहीच सहभाग नव्हता. मृतदेहांना पोलिसांनीच कोणाला हात लावू दिला नाही. फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी उशिरा आल्याने मृतदेह जागेवर ठेवण्यात आले. त्यामुळे शिवसैनिकांनी मृतदेहाची विटंबना केली, या आरोपात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ६०० शिवसैनिकांची पूर्ण नावे जर पोलीस सांगू शकले, तर आपण केव्हाही अटक व्हायला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले. शिवसैनिकांच्या मारेक-यांना अटक होऊन त्यांना शिक्षा व्हायला हवी. तरच त्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर हिंसाचार होतो, तेव्हा पोलीस सदोष मनुष्यवधाचेच गुन्हे दाखल करतात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्यामुळेच हत्याकांड
केडगाव पोटनिवडणुकीत आमचे बूथ ताब्यात घेतले गेले. आमच्या कार्यकर्त्यांना पळवून लावले. आम्ही सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांना याबाबत कळवले. परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही. अन्यथा हत्याकांडाची घटनाच घडली नसती. याला सर्वस्वी हे दोन अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप दिलीप सातपुते यांनी केला.
आरोपी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसोबत
केडगाव हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीच्या नूतन प्रदेशाध्यक्षांसोबत फिरत आहेत. मग ते पोलिसांना कसे सापडत नाहीत, असा सवाल करत केडगावमध्ये अजूनही घबराट आहे. लोक दहशतीखाली आहेत, असे योगिराज गाडे म्हणाले.

 

Web Title: We did not do stone pelting in Kedgaon - claim of Anil Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.