अहमदनगर : ज्या राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची ऊर्जा मिळाली, त्याच ऐतिहासिक गावातून आता शेतकºयांना खरी ‘ऊर्जा’ मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाºया दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे शनिवारी ‘मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पा’चे भूमिपूजन, ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘सरपंच मेळावा’ झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या रूपाने देशाला ग्रामविकासाची दिशा मिळाली. तीन महिन्यांत राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे शेतकºयांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांवर अधिक आहे. अवैध दारूबाबत जनजागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णांनी आश्वस्त केले आहे.
आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्ख्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हजारे म्हणाले, गावागावांतील व्यसनाधीनता संपवायची असेल, तर अवैध दारूविक्री रोखली पाहिजे. अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने हे शक्य होईल. ग्रामरक्षक दल कायद्याबाबत छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यांनीही माहिती मागवून घेतली आहे.

सभेत गोंधळ
सभा सुरू असताना एक अपंग तरुण रोजगार मिळत नसल्याबाबतचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने त्याने सुरक्षाकडे तोडून व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ सभेत गोंधळ झाला. सभेनंतर संबंधित तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याचे निवेदन घेऊन त्याला सोडून दिले.