पाथर्डी : तालुक्यातील जांभळी गावात गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चिमणीचा भडका उडाल्यामुळे लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली़ या घटनेत आई व मुलगा भाजून जखमी झाला आहे़
जांभळी येथील आव्हाड कुटुंबिय बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपी गेले होते़ दरम्यान पहाटेच्या सुमारास वीज गेल्यामुळे त्यांनी रॉकेलची चिमणी लावली होती़ या चिमणीचा भडका उडाला़ त्यामुळे घरातील कपडे व इतर साहित्याने भराभर पेट घेतला़ या आगीत दोन माळवदाचे घरे भस्मसात झाली आहेत. दरम्यान आग लागताच घरातील सर्व व्यक्ती घराबाहेर पळाली़ मात्र, या आगीत जालिंदर अर्जुन आव्हाड (वय १५) हा मुलगा व त्याची आई अलका अर्जुन आव्हाड (वय ४५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पाथर्डी पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या मदतीने आग विझवण्यात आली़