जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला. या ग्रामस्थांपैकी एकाने चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् सर्व सूत्रे हालली. ग्रामस्थांनी मोटारसायकलवरील तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी चौकशीत तिघांकडून चार चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर (सौताडा ) येथून तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी एका मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होते. सौताडा घाटातून जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना त्यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. गाडी पडल्यामुळे घाटात त्यांच्या मदतीसाठी काही लोक थांबले. यावेळी जमलेल्या लोकांमधील एकाने आपल्याच गावातील माजी सैनिक बजरंग डोके यांची चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् डोके यांना फोन केला की तुमच्या गाडीचा अपघात झालाय. यावेळी डोके यांनी माझी गाडी दोन दिवसांपूर्वीच चोरीला गेली असून त्या पोरांना धरून ठेवा असे सांगताच त्या जमलेल्या लोकांनी त्या मुलांना धरून ठेवले. यावेळी डोके व पोलीस एकाच वेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलिसी खाक्या दाखवताच मुलांनी अजून चार गाड्या चोरल्याची माहिती दिली.