संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:40 AM2019-02-17T11:40:20+5:302019-02-17T11:40:30+5:30

पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.

Sunday Special: A bicycle for two soldiers to raise patriotism | संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

Next

सचिन नन्नवरे

मिरी : पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.
नौसेनेच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर अभियंता असणारे मिरी (ता. पाथर्डी) येथील जवान सतीश धरम व हिवरेबाजार (ता. नगर) येथील शिवाजी ठाणगे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अजय मोरे व शरद बोरस्ते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतीक शहा व सिद्धार्थ कांबळे या सहा जवानांनी अवघ्या बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करीत पर्यावरण संवर्धनाचे विविध संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या जवानांनी खास सायकलवरून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सुटी काढून मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथून या भ्रमंतीला सुरूवात केली. मुंबईपासून अलिबाग, मुरूड, जंजिरा, आगरदांडा,वेळात या मार्गे गोव्यातून कोल्हापूर मार्गे सातारा, पुणे व लोणावळ्यावरून पुन्हा मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथे या सायकलवारीची सांगता झाली. या दरम्यान त्यांनी इंधन बचतीचा मुख्य संदेशासह, प्रदूषणमुक्त भारत, झाडे लावा-झाडे जगवा यासह विविध संदेश दिले. या भ्रमंतीमध्ये विविध गावातील नागरिकांनी केलेल्या स्वागतामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली. हा सायकल प्रवास आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे या जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रवासासाठी आम्ही समाजसेवी संस्थेकडे विचारणा केली होती. परंतु त्यांनी कोणतीही आर्थिक मदत न देता अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे या प्रवासासाठी आलेला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च सर्वांनी स्वखर्चाने केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवासादरम्यान वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
प्रवासादरम्यान कोकणातील काशिद घाटात एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा वैद्यकीय माहिती असलेले हिवरेबाजार येथील जवान शिवाजी ठाणगे यांनी वेळीच प्रथमोपचार करून अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचल्याचे समाधान वाटत असल्याचे जवानांनी अभिमानाने सांगितले.

जुलै २०१९ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीनंतर पर्यटनाच्या हंगामानुसार महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करून सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देणार आहे. सायकल चालविल्याने आरोग्य निरोगी राहत असल्याने दररोज सायकल चालविणे गरजेचे आहे. - सतीश धरम, भारतीय नौदलातील अभियंता.

 

 

Web Title: Sunday Special: A bicycle for two soldiers to raise patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.