कोपरगाव : साखर कारखान्यांना बिनव्याजी ४४०० कोटी रूपयांचे कर्ज देण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय साखर उद्योगासाठी अच्छे दिन येणार असल्याचा संकेत आहे़ साखरेच्या आयातीवरील शुल्कात १५ टक्क्यांवरून ४० टक्के वाढ केल्यामुळे ऊस उत्पादकांनाही त्याचा भविष्यात फायदा होईल, असे आ़ अशोक काळे यांनी व्यक्त केले़
साखर उद्योग संकटात असताना केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे़ कर्जाच्या भारामुळे अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ बहुतेक कारखान्यांना कर्जामुळे ऊस उत्पादकांना मनासारखा भाव देता येत नाही़ म्हणूनच कर्जाच्या परतफेडीची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्याची आवश्यकता होती़ केंद्राने ती पूर्ण केल्यामुळे कारखान्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल, असे आ़ काळे म्हणाले़
आयात शुल्कातील वाढीमुळे देशांतर्गत साखरेला उठाव मिळेल़ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण पाच वरून दहा टक्के करण्याच्या परवानगीमुळे साखर उद्योगाला नव्याने उभारी मिळेल़ अत्यंत सकारात्मक अशा या निर्णयांचा ऊस उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा मिळून त्यांची आर्थिक भरभराट होईल़ अर्थात या निर्णयामुळे साखरेचे भाव काही प्रमाणात वाढतीलही, पण भविष्यात ते स्थीर राहुन सर्वसामान्यांनाच त्याचा फायदा होईल, असे काळे यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)