राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुरुष गटात मुंबई, महिला गटात पुणे अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:17 PM2018-01-01T21:17:05+5:302018-01-01T21:20:48+5:30

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत सोमवारी प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर याच्या मुंबई संघाने उमेश म्हात्रेच्या ठाणे संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. महिला गटात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करत विजय मिळविला.

State level Kabaddi competition: Pune Men's team, Women's team Pune Pune | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुरुष गटात मुंबई, महिला गटात पुणे अजिंक्य

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : पुरुष गटात मुंबई, महिला गटात पुणे अजिंक्य

Next
ठळक मुद्देप्रो कबड्डी स्पर्धेतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर हा मुंबईकडून तर उमेश म्हात्रे ठाणे संघाकडून खेळत होता.मुंबई संघाने ठाणे संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. महिला गटात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करत विजय मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्या संघास चषक व रोख बक्षीस देऊन गौरविले.

कर्जत ( गोदड महाराज क्रीडानगरी) : राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत सोमवारी प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर याच्या मुंबई संघाने उमेश म्हात्रेच्या ठाणे संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. महिला गटात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करत विजय मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्या संघास चषक व रोख बक्षीस देऊन गौरविले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी कर्जत येथील गोदड महाराज क्रीडा नगरीत छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेतील अंतिम फेरीचे सामने झाले. पुरूष गटात बलाढ्य मुंबई शहर संघाचा सामना ठाणे संघाबरोबर झाला. प्रो कबड्डी स्पर्धेतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर हा मुंबईकडून तर उमेश म्हात्रे ठाणे संघाकडून खेळत होता. त्यामुळे या दोघाही स्टार खेळाडूंच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सामन्याच्या पहिल्या सत्रापर्यंत दोन्ही संघाचे प्रत्येकी १२ गुण झाले होते. दुस-या सत्रात मुंबई शहर संघाने आक्रमक खेळ केला. मुंबई शहर संघाचा ओंकार जाधव याने उत्कृष्ट चढाई करीत तर मयूर शिवथरकर व संकेत सावंत यांनी उत्कृष्ट पकडी करुन १८ गुणांची कमाई केली. त्यामुळे दुस-या सत्रात मुंबई संघाला ३० गुणांची आघाडी मिळाली. ठाणे संघाकडून उमेश म्हात्रे, शुभम म्हात्रे यांनी संघाची पिछाडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुस-या सत्रात ठाणे संघ १७ गुणांपर्यंतच मजल मारु शकला़ शेवटच्या पाच मिनिटात मुंबई शहर संघाने वेगवान खेळ करीत उत्कृष्ट चढाई व पकडींचे प्रदर्शन घडवित ३७ गुणांची कमाई केली. तर ठाणे संघाला २२ गुणावर समाधान मानावे लागले. अखेर १५ गुणांनी मुंबई शहर संघाने ठाणे संघावर विजय मिळवला. मुंबई शहरने पुरूष विभागात जेतेपद मिळवले व ठाणे सघ उपविजेता ठरला. या गटात मुंबई उपनगर संघाला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिला विभागात पुणे व मुंबई उपनगर यांच्यात सामना रंगला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. सामन्याच्या पहिल्या सत्रात मुंबई उपनगर संघाने दोन गुणांची आघाडी घेतली. पहिले सत्र संपले तेव्हा मुंबई उपनगरचे १४ व पुण्याचे १२ गुण होते. मुंबई उपनगरकडून खेळणा-या सायली नागवेकर, जाधव या राष्ट्रीय खेळाडूंनी पहिल्या सत्रात पुण्याचा घाम काढला. मात्र, दुस-या सत्रात पुणे संघाकडून राष्ट्रीय खेळाडू पुजा गुरव, कोमल गुजर व श्रद्धा चव्हाण यांनी उत्कृष्ट चढाई करीत तर कोमल जोशी हिने उत्कृष्ट पकडी करुन मुंबई उपनगर संघावर ६ गुणांची बढत मिळविली. २८ गुणांसह पुणे संघ विजेता ठरला तर २२ गुण मिळविणारा मुंबई उपनगर संघ उपविजेता ठरला. रत्नागिरी संघाला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या व उपविजेता संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Web Title: State level Kabaddi competition: Pune Men's team, Women's team Pune Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.