State level Chhatrapati Shivaji Maharaj dominates Pune on the first day of Kabaddi tournament | राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी पुण्याचे वर्चस्व

ठळक मुद्देसांगली व रायगडही पुढील फेरीतनगरचा पराभव

साहेबराव नरसाळे, गोदड महाराज क्रीडानगरी, कर्जत
कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पहिल्या दिवसी रात्री रंगलेल्या सामन्यात पुण्याच्या दोन्ही संघानी वर्चस्व गाजवले. मुलींच्या गटातून अटीतटीच्या सामन्यात सांगलीने नाशिकचा अवघ्या एका गुणाने पराभव केला तर मुलांच्या गटात रायगडने कोल्हापूरवर मात केली. राज्य शासनाचा क्रीडा व युवक कल्याण विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.


आज उदघाटनानंतर कर्जतच्या गोदड महाराज क्रीडानगरीत विद्युत प्रकाशझोतात सामने रंगले. मुलींच्या गटात नाशिक विरुध्द सांगलीत अटीतटीचा सामना रंगला. सांगलीने अवघ्या एका गुणाने नाशिकवर मात केली. श्रृती जाडर हिच्या नेतृत्वाखाली नाशिकने पहिल्या हाफमध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुस-या हाफमध्ये मनाली शिंदे हिच्या नेतृत्वाखालील सांगलीच्या संघाने आक्रमक खेळ करत दोन गुण़ांची आघाडी घेतली. नाशिकने २६ गुण मिळविले. सांगलीने २७ गुण मिळवत विजेतेपद खेचून आणले. मुलींच्या गटातील दुसरा सामना पुणे विरुध्द रायगड संघात रंगला. या सामन्यात पुण्याने रायगडवर एकतर्फी १६ गुणांनी विजय मिळविला. पुण्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. कोमल जोरी हिच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या संघाने ३१ गुण मिळविले. या संघात ईश्वरी कोंडाळकर ही रेल्वेकडून खेळणारी तर दिक्षा जोेरी, श्रध्दा चव्हाण व कोमल गुजर या तीन राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता. रायगड संघ ऋषाली मोकळ हिच्या नेतृत्वाखाली खेळला. या संघात निमिषा म्हात्रे व देवयानी म्हात्रे या दोन राष्ट्रीय खेळाडू खेळल्या. रायगडला अवघे १५ गुण मिळवता आले.
मुलांच्या गटात नगर विरुध्द पुणे असा सामना रंगला. यामध्ये पुण्याच्या टीमने नगरचा ८ गुणांनी पराभव केला. पहिल्या हाफमध्ये नगरचा संघ बॅकफूटवर गेला होता. मात्र नंतरच्या हाफमध्ये योगेश लेंडकरच्या नेतृत्वाखाली खेळ सावरला मात्र पराभव टाळत आला नाही. नगरच्या संघात भरत चिपाडे या राष्ट्रीय खेळाडूचा समावेश होता. पुण्याच्या संघात दोन प्रो - कबड्डी आणि दोन राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता. अक्षय जाधव व सुनील सिध्दगवळी हे दोन खेळाडू प्रो - कबड्डी खेळतात तर प्रमोद घुले व मोसीन शेख हे राष्ट्रीय खेळाडू आहेत. याच बळावर पुण्याने नगरचा २६-१८ असा पराभव केला. मुलांच्या गटातील दुसरा सामना रायगड विरुध्द कोल्हापूर असा रंगला. निलेश पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या रायगडने कोल्हापूरचा ३१- २५ असा पराभव केला. आनंद पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या कोल्हापूरला २५ गुणच मिळवता आले. एकूणच पहिल्या दिवशी दोन्ही गटात पुण्याचे संघाने वर्चस्व गाजविले.