काही संधीसाधू पक्ष सोडून गेले, तरी निष्ठावंतांच्या बळावर लढाई जिंकू!

By सुधीर लंके | Published: July 15, 2019 06:09 AM2019-07-15T06:09:32+5:302019-07-15T06:10:18+5:30

ज्यावेळी पक्ष संकटात असतो तेव्हाच पक्षाच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक असते.

Some opportunists left the party, but fight the battle for the loyalists! | काही संधीसाधू पक्ष सोडून गेले, तरी निष्ठावंतांच्या बळावर लढाई जिंकू!

काही संधीसाधू पक्ष सोडून गेले, तरी निष्ठावंतांच्या बळावर लढाई जिंकू!

Next

- सुधीर लंके 
अहमदनगर : ज्यावेळी पक्ष संकटात असतो तेव्हाच पक्षाच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक असते. तोच खरा कार्यकर्ता असतो. लोकसभेत आमच्या पक्षाला अपयश आले. पण,आम्ही डगमगलेलो नाहीत. आत्मपरीक्षण करुन पक्ष बांधणी करणे हा आपला अजेंडा आहे. काही संधीसाधू लोक बाहेर गेल्याने पक्ष कधीच कमकुवत होत नसतो. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज्यातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यातील अपयशी फडणवीस सरकारला खाली खेचून दाखवू, असा आत्मविश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. थोरात यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची धोरणे स्पष्ट करतानाच भाजपवर सडकून टीका केली.
प्रश्न : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनात काय भावना आहेत?
थोरात : एखाद्या कार्यकर्त्याला पक्षाचे राज्यातील सर्वोच्च पद भूषवायला मिळणे हा त्याचा बहुमान असतो. तो बहुमान मला मिळाला याचा आनंदच आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुमच्याकडे जबाबदारी आली. पक्षबांधणीसाठी वेळ कमी आहे असे वाटते का?
वेळ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. पण, जेव्हा संधी मिळेल तेव्हा काम सुरु करायचे हे आपले धोरण असते. मला चांगली कार्यकारिणी पक्षाने दिली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फरक असतो. लोकसभा निवडणूक भाजपने वेगळ्याच भावनिक मुद्याकडे वळवली. विधानसभेला ती परिस्थिती नाही. विधानसभेला स्थानिक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार, व्यापारी, कारखानदार हे सर्व अस्वस्थ आहेत. मंदी व महागाईने जनता त्रस्त आहे. याची उत्तरे भाजपला द्यावी लागतील. जे बोलले ते त्यांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीही नाही व आज पीक कर्ज मिळायलाही तयार नाही.
तुमच्या जोडीला पक्षाने पाच कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत. त्याचा फायदा होईल की निर्णयप्रक्रियेस विलंब लागेल?
निश्चितच फायदा होईल. वेगवेगळ्या प्रादेशिक विभागांना संधी व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने यातून केला आहे. मी जेथे पोहोचू शकत नाही तेथे आमचे कार्यकारी अध्यक्ष व इतर पदाधिकारी पोहोचतील. पक्ष विस्तारेल.
राधाकृष्ण विखे भाजपच्या प्रेमात असतानाही पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते पदावर कायम ठेवले. पक्षाने चूक केली असे वाटते का?
जे झाले त्यावर मला भाष्य करायचे नाही. आमचा सध्याचा विरोधी पक्षनेता अत्यंत तरुण व आक्रमक आहे एवढेच खात्रीने सांगतो.
मुख्यमंत्री म्हणतात काँग्रेसचा विरोधी पक्षनेता फोडून आम्ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला.
असे सर्जिकल स्ट्राईक करुन जागा भरण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांचे संघटन आहे. तरुणांना सोबत घेऊन आम्ही या गाळलेल्या जागा भरु.
मुख्यमंत्री परवा पंढरपुरात म्हणाले, पुढच्या वर्षीही विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून मीच करणार.
जनतारुपी विठ्ठल जो आहे तो ठरवेल ही पूजा करण्याची संधी कोणाला द्यायची. हा विठ्ठल आता आमच्या बाजूने आहे.
काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
हा निर्णय पक्ष व जनता घेईल. तूर्तास निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून सत्ता आणणे एवढेच आपल्या डोक्यात आहे.
तुम्ही संयमी म्हणून ओळखले जातात. हा गुणधर्म प्रदेशाध्यक्षपदासाठी चालेल?
जे गरजेचे असते ते मी करत असतो. लोकशाहीत संयम महत्त्वाचा असतो. तो आपण नेहमी दाखवितो. मात्र, जनतेसाठी आक्रमक होण्याची वेळ आली तर तेही रुप धारण करतो.


विधानसभेला उमेदवारी देताना काय धोरणे राहतील?
निवडणूक हा ‘नंबर गेम’ असतो. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट हे धोरण तर राहीलच. मात्र, तरुण, महिला या घटकांना संधी देण्यास आपले प्राधान्य राहील.
विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे मांडणार? किती जागांचा तुमचा अंदाज आहे?
या सरकारने सर्वांना फसविले. हाच प्रचाराचा मुद्दा राहील. जागांचा आकडा मी सांगणार नाही. मात्र, मुख्यमंत्री काँग्रेस लोकशाही आघाडीचा राहील हे मात्र नक्की.
>काँग्रेसमध्ये ‘मामा-भाचे’ राज!
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाली आहे, तर त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या निमित्ताने पहिल्यांदाच ‘मामा-भाचे’ यांच्या ताब्यात पक्ष संघटन आले आहे. यावर थोरात म्हणाले, सत्यजित हा अगदी तळापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला आहे. त्याने नवीन तरुणांना सोबत घेऊन संघटन बांधले आहे. मला वाटते, या दोन्ही संघटना एकमेकाला खूप पूरक काम करतील.

>वंचित आघाडी, डावे पक्ष यांना सोबत घेणार
भाजपविरोधातील लढाई ही केवळ सत्तेची नव्हे, तर तत्त्वाची लढाई आहे. भाजपला राज्यघटना व लोकशाही नकोच आहे. त्यामुळे राज्यघटनेवर प्रेम करणाºया सर्व घटकांनी एक व्हावे, हे आपले धोरण आहे. राष्टÑवादी व आम्ही सोबत आहोतच.पण वंचित आघाडी, भाकप, माकप, स्वाभिमानी संघटना, शेतकरी संघटना या सर्वांनी एक व्हावे, असाच आपला प्रयत्न राहील. समाजातील विचारवंत, लेखक, कलाकार या सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करू, असे थोरात यांनी सांगितले.

Web Title: Some opportunists left the party, but fight the battle for the loyalists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.