शेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:09 PM2018-11-08T15:09:46+5:302018-11-08T15:11:09+5:30

गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे.

Somaiya industrial group in kopargaon | शेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद 

शेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद 

Next

कोपरगाव - तालुक्यातील पूर्व भागातील गोदावरी नदीतून जायकवाडीला सोडलेल्या पाण्यातून शिंगवे बंधाऱ्यात दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती करून थोडे पाणी साठवले आहे. हेच पाणी सोमैया उद्योग समूहाच्या गोदावरी बायोरिफायनरीज रासायनिक प्रकल्प हा अनेक इलेक्ट्रिक मोटारीच्या सहायाने रात्रंदिवस बेसुमार पाणी उपसा करत उद्योगासाठी वापरत असल्याने कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (8 नोव्हेंबर) रोजी सकाळी वारी, कान्हेगाव व सडे येथील शेकडो शेतकऱ्यांनी सर्व मोटारी बंद पाडत,पाईपलाईन फोडून टाकल्या.

माजी सभापती मच्छिंद्र टेके बोलताना म्हणाले, यंदा तालुक्यात दुष्काळ पडला आहे, जमिनी नापेर राहिल्या आहे अशा वेळी दुर्दैवाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. गोदावरी पात्रातून ते पाणी वाहिले ते आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. म्हणून आम्ही व आमच्या शेतकऱ्यांनी शासनाला विनंती करून तालुक्यातील गोदावरी नदीवरील सर्वच बंधाऱ्यात दोन फळ्या पाणी राहूद्या जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल परंतु याच गोदावरी नदीवरील शिंगवे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मात्र गोदावरी बयोरीफायनरीज हा कारखाना रात्रंदिवस २४ तास सोळा मोटारी लाऊन पाणी उपसतो आहे व उद्योगासाठी वापरात आहे. या संदर्भात आम्ही शासनाला कळवले,स्थानिक कारखाना व्यवस्थापनाला विनंती केली,वारी,कान्हेगाव, सडे या ग्रामपंचायतीनी पत्रव्यवहार केला. तरीही स्थानिक व्यवस्थापनाने दाद दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतापून पाणी उपसा करणारी यंत्रणा उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.जर व्यवस्थापने ही यंत्रणा तत्काळ उचलत पाणी उपसा बंद केला नाही तर शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन पुढील कारवाई करावी लागेल.अशी वेळ या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टीने जाणूनबुजून आणली असल्याचे मच्छिंद्र टेके शेवटी म्हणाले.      
    
कारखाना व्यवस्थापणाचा ग्रामस्थांशी समन्वयाचा अभाव

गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक एस मोहन यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी पदभार स्वीकारला तेव्हा पासून स्थानिक ग्रामस्थ, कामगार, शेतकरी यांच्याशी यांचे कायमच खटके उडत आहे. परंतु आता मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने व्यवस्थापन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

 

Web Title: Somaiya industrial group in kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.