सोशल मीडियाच्या मदतीने अनाथ भावा-बहिणीने शोधलं आपलं गाव, आडनाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 11:11 AM2019-07-03T11:11:59+5:302019-07-03T11:12:26+5:30

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबाही आश्रमशाळेत सोडून निघून गेले.

From the social media, discovered their village | सोशल मीडियाच्या मदतीने अनाथ भावा-बहिणीने शोधलं आपलं गाव, आडनाव!

सोशल मीडियाच्या मदतीने अनाथ भावा-बहिणीने शोधलं आपलं गाव, आडनाव!

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आजोबाही आश्रमशाळेत सोडून निघून गेले. बारावी पास झाल्यानंतर आकाश आणि प्रिया या भावंडांना पुढील शिक्षणासाठी जातीचा दाखला हवा होता. त्यांनी सोशल मीडियाच्या मदतीने गावाचा शोध घेऊन ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर जातीचा दाखल मिळविला.
त्या दोन मुलांचे पंजोबा श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील गजाराम राणू साळुंके (चर्मकार समाज) पोटाची खळगी भरण्यासाठी सुरतला (गुजरात) गेले होते. तिकडेच लहू साळुंके व अनिता साळुंके यांना आकाश व प्रिया ही दोन मुले झाली. अगोदर आईचे छत्र हरपले. त्यानंतर पाच-सहा महिन्यात वडिलांचे निधन झाले. ही मुलं पोरकी झाली. त्या दोघांचे आजोबा बापूराव साळुंके यांनी दोन्ही मुलांना पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रूक येथील माहेर आश्रमशाळेत प्रवेश दिला.
आश्रमशाळेतील अधीक्षकांनी हिंदू चर्मकार म्हणून त्यांच्या जातीची नोंद केली. त्यानंतर आकाश व प्रिया एकाच वर्गात शिकले. नुकतेच दोघेही बारावी उत्तीर्ण झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची गरज होती. त्यांनी कधीही आपले गाव पाहिले नव्हते. गावात कुणाची ओळख ना पाळख अशा परिस्थितीत त्यांनी सोशल मीडियावर गाव, आडनाव शोधले. त्यांना साजन साळुंके या व्यक्तीचा सुगावा लागला. त्यानंतर दोघे उक्कडगावला (ता.श्रीगोंदा) आले. त्यांनी बापूराव हे आजोबा असल्याचे सांगितले. त्यांनी आकाश व प्रियाला सहारा दिला होता.
गावातील ग्रामपंचायतमध्ये आजोबांच्या ना वडिलांच्या जातीच्या दाखल्याची नोंद. पणजोबांच्या दाखल्यावरून जातीचा काहीसा सुगावा लागला. पण या मुलांना रहिवासी व जातीचा दाखला देण्यासंदर्भात ग्रामसेवक संदीप लगड यांना अडचणी आल्या.
ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी बैठक बोलविली. त्या बैठकीत आकाश व प्रिया मूळ उक्कडगाव येथील रहिवासी असून त्यांची जात हिंदू चर्मकार आहे, असा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आकाशाला बीबीए तर प्रियाला बॅँकिंग क्षेत्रात अधिकारी व्हायचे आहे.
आमची आता कष्ट करून शिकण्याची तयारी आहे, असे या भावंडांनी सांगितले. भविष्यात त्यांना शैक्षणिक खर्चाची अडचण आली तर सर्व खर्च अग्निपंख फाउंडेशन करणार आहे.

Web Title: From the social media, discovered their village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.