ठळक मुद्देअखेरची रात्र : नाट्यसमीक्षण

नवनाथ खराडे
अहमदनगर : चित्रपट क्षेत्रात प्रथितयश मिळवलेला गुरू हा एक कलावंत. प्रेरणा नावाची गायिका असलेली त्याची अर्धागिनी. चित्रपटाच्या माध्यमातून गुरूच्या आयुष्यात प्रवेश करणारी अभिनेत्री प्रतिभा. याचमुळे गुरूच्या संसारिक आयुष्यात ठिणगी पडते. गुरू द्विधा मन:स्थितीत अडकतो. गुरू प्रेरणा आणि प्रतिभेपासून दूर राहू शकत नाही, अन् सिनेमापासून तर अजिबातच नाही. मात्र या दोघी गुरूला सोडून निघून गेल्यामुळे गुरूच्या जीवनाचा अंत होतो. अशा प्रकारे एका कलावंताची व्यथा ‘अखेरची रात्र’ या शोकात्मक नाटकातून मांडण्यात आली आहे.
राज्य नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी ‘अखेरची रात्र’ हे नाटक सादर झाले. सप्तरंग थिएटर्सने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले असून, प्रा. श्याम शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर सहायक दिग्दर्शन अंजना पंडित हिने केले आहे. गुरू नावाच्या सिनेमाक्षेत्रात यश मिळविलेल्या एका कलावंताचा कलाप्रवास आणि संसारिक प्रवास नाटकातून मांडण्यात आला आहे. कलावंत गुरू दत्तच्या जीवनात गायिका प्रेरणा आणि अभिनेत्री प्रतिभा प्रवेश करतात. प्रेरणा ही लग्नाची बायको असते, तर त्यानंतर प्रतिभाच्या प्रेमात गुरू बुडतो. प्रेरणा प्रतिभास स्वीकारत नाही. समाजमान्यतेसाठी गुरूला लग्न करण्याचा आग्रह प्रतिभा धरते. मात्र गुरू त्यास नकार देतो. या नकारामुळे प्रतिभा गुरूपासून फारकत घेते. त्यानंतर गायिका प्रेरणाही गुरूला सोडून जाते. यातूनच पुढे गुरूच्या जीवनाची ‘अखेरची रात्र’ येते. कलाक्षेत्रात प्रथितयश मिळविलेल्या कलाकाराला समाजामुळे त्याच्या संसारिक जीवनात अपयश आल्याचे ‘अखेरची रात्र’ या नाटकातून दाखविण्यात आले आहे. अब्बास यांच्या लेखणीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो. त्यानंतर प्रेरणा आणि प्रतिभा दोघीही अब्बास यांच्या घरी येतात. याच घरी गुरूचा संपूर्ण जीवन प्लॅशबॅकमध्ये उलगडतो.
नाटकामध्ये कलावंत गुरूची भूमिका प्रा. रवींद्र काळे यांनी साकारली आहे. गुरूच्या पहिल्या पत्नीची गायिका प्रेरणाची भूमिका अनघा पंडित हिने साकारली आहे. प्रतिभा हिची भूमिका आकांक्षा शिंदे हिने निभावली असून, अब्बासची भूमिका सुनिल तरटे यांनी केली आहे.
केंद्रस्थानी असलेल्या गुरूची भूमिका प्रा. काळे यांनी साकारली आहे. किरकोळ अपवाद वगळता भूमिका उत्तम निभावली आहे. अब्बासची भूमिकाही उत्तम झाली आहे. आकांक्षा शिंदे हिनेही पूर्ण ताकद पणाला लावून भूमिका पेलावली आहे, तर अनघा पंडित हिने अप्रतिम काम केले आहे. सादरीकरण उत्तम झाले आहे. पहिल्या अंकातील नाटकाची संथ गती दुसºया अंकातही कायम आहे. संपूर्ण नाटकात लाइटचा वापर उत्तम करण्यात आला आहे. एका ठिकाणी क्षणभर सुरू होऊन विझलेला लाइट चुकी दाखवून जातो. सत्तरच्या दशकातील परिस्थितीवर हे नाटक आधारित आहे. मात्र प्रेक्षकांना सत्तरच्या दशकात दिग्दर्शकाला घेऊन जाण्यात यश आलेले दिसत नाही. अनेक वेळा नाटकातील हिंदी भाषा खटकते. अब्बास हे एकटेच पात्र मुस्लिम असल्याने किंवा नाटक सिनेमा क्षेत्राशी संबंधित असल्याने हिंदी भाषेचा वापर करण्यात आला असावा. मात्र, तीनही शक्यतांचा विचार करता हिंदी भाषेचे उच्चार खटकतात. ही भाषा सिनेमाक्षेत्रातील हिंदी, मुसलमानांची हिंदी किंवा अस्सलिखित हिंदी वाटत नाही. संगीत अलीकडील काळातील वापरल्याने सत्तरचा काळ जाणवत नाही. नेपथ्य, वेषभूषा, रंगभूषा या बाबी चांगल्या झाल्या आहेत.

अखेरची रात्र

निर्मिती : सप्तरंग थिएटर्स अहमदनगर
लेखक : लक्ष्मीकांत देशमुख
दिग्दर्शक : श्याम शिंदे
पात्र : गुरू : प्रा. रवींद्र काळे,
अब्बास : सुनील तरटे
प्रेरणा : अनघा पंडित
प्रतिभा : आकाक्षा शिंदे
तंत्रसहाय्य
नेपथ्य : हेमंत कुलकर्णी, शंभूराजे घोलप
प्रकाशयोजना : बिपीन काजळे
संगीत : रवींद्र वाणी, शुभांगी ओहोळ, शिवम तुपचे
वेषभूषा : अंजना पंडित, सोनल काळे
रंगभूषा : चंद्रकात सैंदाणे, शिल्पा लोखंडे
रंगमंच व्यवस्था : सुधीर देशपांडे, मयूर खोत, दीपक ओहोळ, हेमत लोखंडे, कुंदा शिंदे
व्यवस्थापन - शशिकांत मगर


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.