शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:06 AM2018-12-19T11:06:57+5:302018-12-19T11:07:08+5:30

नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर शिवसेना-भाजपचे नगरसेवक वेगळ््या वाटांनी सहलीवर गेले.

Shiv Sena-BJP | शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव

शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव

googlenewsNext

अहमदनगर : नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर शिवसेना-भाजपचे नगरसेवक वेगळ््या वाटांनी सहलीवर गेले. भाजपचे सर्व नगरसेवक नाशिक येथूनच सहलीवर रवाना झाले. शिवसेनेचे निम्मे नगरसेवक सहलीवर तर निम्मे नगरसेवक नगरमध्ये परतले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बसपासह अपक्ष नगरसेवकही मंगळवारी सायंकाळपर्यंत नगरमध्येच होते. सेना-भाजपच्या नगरसेवकांनी वेगळ््या वाटा धरल्याने त्यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गटनोंदणी झाल्यानंतर इतर नगरसेवक नगरमध्ये असताना भाजपला नेमकी कोणाची भीती आहे? याबाबत संशय निर्माण झाला आहे.
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेस गट नोंदणी करणार की नाही? हे बुधवारी स्पष्ट होईल. बहुजन समाज पक्षाचे चार नगरसेवकही त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. महापौरपदासाठी सरसावलेल्या भाजपने त्यांचे सर्व १४ नगरसेवक गटनोंदणीनंतर नाशिक येथून सहलीवर रवाना झाले आहेत.
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती आहे. कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याचे वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. ६८ पैकी सर्वाधिक २४ जागा मिळविणारी शिवसेना भाजपशी (१४) युती करण्याबाबत सध्यातरी तयार नाही. शिवाय सेनेला पाठिंबा देण्याची भाजपची तयारी नाही. वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा नसल्याने स्थानिक भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचा महापौर झाल्यास शहराच्या विकासाला तीनशे कोटी रुपये मिळतील, याच एका मुद्द्यावर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी संजय शेंडगे हेच शिवसेनेचे गटनेते होते. ते सेनेसोबत एकनिष्ठ राहिले. यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे निवडून आल्या. सर्वात विश्वासू नगरसेवक म्हणून पुन्हा त्यांच्यावरच गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मालन ढोणे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका असून खा. दिलीप गांधी यांच्या गटातील व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया धनंजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रिया या माजी नगरसेवक व माजी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धनंजय जाधव यांच्या पत्नी आहेत. जाधव हेही अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. महापालिकेतील काँग्रेसच्या पाचही जागा डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या आदेशानेच सुप्रिया यांची गटनेतेपदी निवड झाली.
शिवसेनेच्या गटनेतेपदी रोहिणी संजय शेंडगे, भाजपच्या गटनेतेपदी मालन ढोणे आणि काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया जाधव यांची निवड करण्यात आली. गतवेळी संजय शेंडगे (सेना), दत्ता कावरे (भाजप), संदीप कोतकर (काँग्रेस), समद खान (राष्ट्रवादी), गणेश भोसले (मनसे) असे गटनेते होते. शिवसेना वगळता इतर सर्वच पक्षात गटनेतेपदाचे वाद होते. नंतरच्या टप्प्यात सुवेंद्र गांधी (भाजप), संपत बारस्कर (राष्ट्रवादी), सुवर्णा कोतकर (काँग्रेस), वीणा बोज्जा (मनसे) यांची पक्षातील नगरसेवकांनी गटनेते म्हणून निवड केली. मात्र हे गटनेते महापालिका प्रशासनाने शेवटपर्यंत ग्राह्य धरले नव्हते. तरीही राजकीय फायद्यासाठी गटनेतेपदाचे पत्र घेऊन पक्षांतर झाले. त्यामुळे यावेळी सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेत विश्वासू नगरसेवकाला गटनेतेपद दिले आहे. आता राष्ट्रवादी, बसपा हे कोणाला गटनेता करणार हे बुधवारी स्पष्ट होईल.
बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांची बुधवारी गटनोंदणी होणार आहे. त्यांचाही गट स्वतंत्र असेल. सचिन जाधव आणि मुदस्सर शेख यांच्या नेतृत्त्वाखाली हा गट कार्यरत आहे. सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव किंवा शेख यांच्यापैकी एक गटनेता होऊ शकेल. ज्याचा महापौर त्याला पाठिंबा, असे बहुजन समाज पक्षाच्या या चारही नगरसेवकांचे धोरण दिसते आहे. गटनोंदणी झाल्यानंतर आणि राजकीय कल पाहून हा गट निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Shiv Sena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.